मेहराजुद्दिनच्या कबुलीने केला आयएसआयचा पर्दाफाश

जम्मू: भारताचे तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यासह अनेक महत्वाच्या नेत्यांवर सन २००२ मध्ये नेपाळ येथे जीवघेणे हल्ले करण्याचा कट पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयने आखला होता. मात्र त्यासाठी स्फोटके आणणार्‍या पाक राजनैतिक अधिकार्‍याला नेपाळ पोलिसांनी स्फोटकांसह जेरबंद केल्याने हा कट उधळला गेला; अशी कबुली येथे घुसखोरीच्या प्रयत्नात असलेला कुख्यात अतिरेकी मेहराजुद्दिन याने गुप्तचर यंत्रणांकडे दिली.

कंदहार विमान अपहरण आणि राजधानी दिल्लीतील बॉम्बस्फोट प्रकरणातील संशयित मेहराजुद्दिन याला जम्मू काश्मीर पोलिसांनी १३ सप्टेंबर रोजी नेपाळ हद्दीतून भारतात येताना अटक केले आहे. मेहराजुद्दिन हा अत्यंत कडवा अतिरेकी असल्याने त्याची चौकशी राष्ट्रीय तपास यंत्रणा, केंद्रीय अन्वेषण विभाग, लष्कराचा गुप्तचर विभाग आणि जम्मू काश्मीर पोलीस करीत आहेत.

नेपाळमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सार्क परिषदेच्या वेळी घातपात घडवून वाजपेयी यांच्यासह महत्वाच्या भारतीय नेत्यांना लक्ष्य करण्याचा कट आयएसआयने आखला होता. या कटाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी नेपाळमधील पाकिस्तानी दूतावासाच्या व्हिसा विभागात काम करणार्‍या अयुब उर्फ अर्शद चीमा या अधिकार्‍यावर होती. आपण चीमा याच्या संपर्कात होतो. मात्र चीमाला हा कट पूर्णत्वाला जाण्यापूर्वी आरडीएक्स स्फोटकांच्या साठ्यासह पकडण्यात आले आणि त्यानंतर त्याला नेपाळमधून बाहेर घालवून देण्यात आले. त्यामुळे हा कट फसला; असे मेहराजुद्दिन याने तपास यंत्रणांना सांगितले.