पुणे: राजकीय पक्ष स्थापन करण्याच्या मुद्द्यावरून अरविंद केजरीवाल आणि आपल्यात दुफळी असल्याची स्पष्ट कबुली ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी प्रथमच पत्रकारांसमोर दिली. केजरीवाल पक्ष काढण्यास स्वतंत्र आहेत. मात्र आपण त्यांच्या प्रत्येक उमेदवाराला पाठींबा देणार नाही; असेही अण्णांनी स्पष्ट केले. मात्र आमची साधने वेगळी असली तरीही भ्रष्टाचारमुक्त भारत हे एकच उद्दीष्ट असल्याचे ‘डिप्लोमॅटिक’ स्पष्टीकरणही त्यांनी दिले.
जनतेला सक्षम राजकीय पर्याय देण्यासाठी राजकीय पक्ष स्थापन करणे ही केजरीवाल यांची महत्वाकांक्षा आहे. आपण स्वतः कोणताही पक्ष स्थापन करणार नाही किंवा निवडणूकही लढविणार नाही हे आपण सुरुवातीपासूनच सांगत आहोत. मात्र एखादा उमेदवार खरोखरच प्रामाणिक, स्वच्छ पार्श्वभूमीचा आणि सेवाभावी असेल; तर त्याला जरूर पाठींबा देऊ; असेही अण्णांनी सांगितले.
केजरीवालांनी पक्ष स्थापन केल्यास त्यांच्या उमेदवारालाही या चाळणीतूनच जावे लागेल. त्यांच्या पक्षाच्या सर्व उमेदवारांना आपला सरसकट पाठींबा असणार नाही; असे अण्णांनी सांगितले.
सध्याच्या काळात जनतेमध्ये जागृती निर्माण करून त्यांनी अधिकाधिक चांगले उमेदवार लोकसभेत आणि विधानसभेत पाठवावे; यासाठी देशभर दौरा करण्याचे आणि समविचारी कार्यकर्त्यांशी चर्चा करून त्यांना आंदोलनाशी जोडून घेण्याचे नियोजन असल्याचे अण्णांनी सांगितले. याच दौर्यात विविध ठिकाणच्या विविध क्षेत्रातील मान्यवरांशी चर्चा करून आंदोलनाची दिशा निश्चित केली जाणार असल्याचेही अण्णांनी सांगितले.