आयडिया, एअरटेल आणि व्होडाफोन ग्राहकसंख्याही घटली

मुंबई दि.१७ -देशात मोबाईल आल्यापासून प्रथमच मोबाईल ग्राहकांची संख्या घटत चालल्याचे ट्रायच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाल्यानंतर आता एअरटेल, व्होडाफोन आणि आयडिया मोबाईल ग्राहकांची संख्याही जुलैच्या तुलनेत ऑगस्टमध्ये ५० लाखांनी घटली असल्याचे दिसून आले आहे. यापूर्वी जुलैमध्ये रिलायन्स कम्युनिकेशनची ग्राहकसंख्या दोन कोटींनी घटली होती व टाटा टेलिकॉम, एमटीएस. युनिनॉर, बीएसएनएल, यांच्याही ग्राहकसंख्येत लक्षणीय घट झाली होती.

मोबाईल ऑपरेटर असोसिएशनचे महासंचालक राजन मॅथ्यू यांनीही एअरटेल, आयडिया व व्होडाफोनच्या ग्राहकांची संख्या ५० लाखांनी घटल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ते म्हणाले की वापरात नसलेल्या ग्राहकांचे नंबर रद्द करण्यासाठी टेलिकॉम विभागाकडून कंपन्यांवर दबाव येत आहे. नंबरची कमतरता असल्याने वापरात नसलेले नंबर अन्य ग्राहकांना देता यावेत असा त्यामागे हेतू आहे. मात्र वरील ऑपरेटर्स कडे असलेल्या ग्राहकांतील ९० टक्के हे वापरात असलेले ग्राहक आहेत त्यामुळे वापरात नसलेले थोडे नंबर रद्द करावे लागले आहेत. सर्व कंपन्यांकडे मिळून २१५ दशलक्ष ग्राहक मोबाईल वापरात नसलेले आहेत. यामुळे येत्या काळात मोबाईल ग्राहकसंख्या आणखी घटण्याचीही शक्यता आहे.

वापरात नसलेले नंबर रद्द केले गेल्याने कंपन्यांची कार्यक्षमता अधिक वाढेल व खर्चातही कपात होईल असाही या मागे उद्देश आहे. प्रत्येक कंपनीला वापरात नसलेला नंबर मेनटेन करण्यासाठी रूपयापेक्षा कमी खर्च येत असला तरी वापरात नसलेल्या नंबरची संख्या विचारात घेतली तर ही रक्कम प्रचंड मोठी असेल असेही मॅथ्यू यांनी सांगितले.