कॉश्च्युम ज्युवेलरी व्यवसायाची अतिवेगाने वाढ

मुंबई दि.१६- सोने आणि चांदीने दररोज दरवाढीचा नवा विक्रम नोंदविण्यास सुरवात केली असतानाच देशातील कॉश्च्युम ज्युवेलरीच्या व्यवसायात वेगाने वाढ होत असून २०१४ पर्यंत हा व्यवसाय ११ हजार कोटी रूपयांचा टप्पा गाठेल असा अंदाज या क्षेत्रातील तज्ञ करत आहेत. ही वाढ २० टक्के इतकी असेल असाही अंदाज वर्तविण्यात येत आहे.

सोने चांदी महागल्याने फॅशनसाठी आता इमिटेशन आणि कॉश्च्युम ज्युवेलरीला ग्राहक अधिक पसंती देत आहेत. यात विविध प्रकार उपलब्ध आहेत आणि जनतेने या ज्युवेलरीचा स्वीकारही केला आहे असे ज्युवेलिया अॅन्ड यू इंडियाचे संस्थापक व सीइओ चैतन्य आगरवाल यांचे म्हणणे आहे. देशात इमिटेशन ज्युवेलरी म्हणजे खोट्या दागिन्यांचे मार्केट ७००० कोटींचे आहे. या दागिन्यांच्या निर्मितीत चीननंतर भारताचा जगात दुसरा क्रमांक आहे. भारतातील या दागिन्यांना यूएस. युरोप, कॅनडा, ऑस्ट्रेलिया,व अनेक आशियाई देशांतून मोठी मागणीही आहे.

भारतात कमी पैशात उपलब्ध असणारा कारागीर वर्ग तसेच बेस धातूची मुबलक उपलब्धता आणि या दागिन्यंत वापरण्यात येणारे विविध प्रकारचे खडे आणि प्लॅस्टीक मणी तुलनेने स्वस्त आहेत. त्यामुळे भारतात या व्यवसायाची वेगाने वाढ होते आहे. राजस्थान, उत्तरप्रदेश, प.बंगाल, बिहार व मध्य प्रदेश या दागिन्यांची मुख्य उत्पादक राज्ये आहेत. खोटे दागिने १०० रूपयांपासून उपलब्ध आहेत आणि विशेष म्हणजे शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातूनही या दागिन्यांची मागणी चांगली आहे असेही आगरवाल म्हणाले.