नवी दिल्ली दि.१३- एअर इंडियाच्या ताफयात चार वर्षांच्या प्रतिक्षेनंतर दाखल झालेल्या बोईंग ७८७ ड्रीमलायनरची उड्डाणे येत्या बुधवारपासून सुरू होत असून सुरवातीला ही उड्डाणे देशांतर्गतच करण्यात येणार आहेत. हिवाळ्यापासून मात्र ऑस्ट्रेलिया आणि युरोपसाठी ड्रीमलायनरची आंतरराष्ट्रीय उड्डाणेही सुरू होतील असे समजते.
या वर्षअखेर एअर इंडियाच्या ताफ्यात आणखी पाच ड्रीमलायनर दाखल होत आहेत. बाकीची २२ विमाने २०१६ सालात मिळणार आहेत. हवाई वाहतूक मंत्री अजितसिंग यांच्या म्हणण्यानुसार या विमानांमुळे एअर इंडियाला नफा मिळण्याची शक्यता आहे. अन्य विमानांच्या तुलनेत या विमानांची इंधनबचत १५ टक्के आहे. त्यामुळे एअर इंडियाच्या महाराजाला पुन्हा पूर्वीचे वैभव मिळणे शक्य होईल.
तोट्यात असलेल्या एअर इंडियाचा तोटा ८.३ बिलीयन डॉलर्सवर पोहोचला असून केंद्र सरकारने कर्जमुक्तीसाठी मदत म्हणून ५.७ बिलीयन डॉलर्सची मदत करण्याचे आश्वासन एप्रिलमध्येच दिले आहे. शिवाय अनेक काटकसरीचे उपायही कंपनीने हाती घेतले आहेत. मात्र या क्षेत्रातील तज्ञांच्या मते एअर इंडिया फायद्यात यायला हवी असेल तर प्रथम मंत्री, आमदार, खासदार व त्यांच्या कुटुंबासाठी देण्यात येणारी मोफत सेवा पूर्ण बंद केली पाहिजे.