सत्ताधारी राक्षसी मनोवृत्तीचे: अडवानी

नवी दिल्ली: नैराश्यग्रस्त सत्ताधार्‍यांच्या राक्षसी मनोवृत्तीमुळे सध्याच्या काळात आणीबाणीपेक्षाही वाईट परिस्थिती निर्माण झाली असल्याची कठोर टीका भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांनी आपल्या ब्लॉगवर केली आहे.

देशद्रोह आणि राष्ट्रीय प्रतीकांचा अवमान प्रकरणी मुंबई पोलिसांनी अटक केलेल्या व्यंगचित्रकार असीम त्रिवेदी यांच्या अटकेसंदर्भात अडवानी यांनी सत्ताधार्‍यांवर कठोर टीका केली.

स्वातंत्र्योत्तर ६५ वर्षात भारतात आणीबाणीचा काल हे जनतेच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यांच्या दृष्टीने अतिशय वाईट काळ असल्याची आपली आतापर्यंत समजूत होती. मात्र त्रिवेदी यांच्या अटकेसंदर्भात विचार करता सध्याच्या काळातील राजकीय व्यवस्था ही आणीबाणीच्या काळापेक्षाही वाईट असल्याचा आरोप अडवानी यांनी केला आहे.

त्रिवेदी यांचे समर्थन करताना अडवानी म्हणाले की; ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनात सरकारच्या धोरणाविरोधातील व्यंगचित्र प्रसिद्ध करणे हाच त्यांचा गुन्हा आहे आणि त्यांच्याबद्दल असलेल्या आकसामुळेच सरकारने त्यांच्यावर डूख धरून ही कारवाई केली आहे.