कोळसाकांडात ‘काळवंडलेल्या’ नेत्यांवर संक्रांत

नवी दिल्ली: कोळसा खाण घोटाळा घडलाच नाही; अशी भूमिका काँग्रेस जाहीररित्या मांडत असली तरीही कोळसाकांडात हात काळे झालेल्या स्वपक्षीय नेत्यांची पाठराखण न करण्याचे काँग्रेस नेतृत्वाने ठरविले असून त्यामुळे अनेकांना आपली पदे गमवावी लागण्याची शक्यता आहे.

कोळसाकांड प्रकरणात आक्रमक विरोधकांमुळे काँग्रेसला बचावाचा पवित्र घ्यावा लागला आहे. आणखी मानहानी नको म्हणून पक्ष नेतृत्वाने या प्रकरणात आरोप असलेल्या नेत्यांवर कारवाई करण्याचा पवित्रा घेण्याचे ठरविले आहे. त्यानुसार पक्षाच्या रडारवर प्रथमस्थानी आहेत पर्यटनमंत्री सुबोधकांत सहाय! सहाय यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून एसकेएस इस्पात कंपनीला खाणी प्रदान करण्याची शिफारस केली होती. त्यानुसार या कंपनीला त्वरित खाणींचे वाटप करण्यात आले. या कंपनीत सहाय यांचे बंधू सुधीरकांत संचालक आहेत.

विद्यमान कोळसा मंत्री श्रीप्रकाश जयस्वाल यांनी खाण वाटपातून थेट ‘स्वहित’ साधल्याचा कोणताही पुरावा नसला तरी त्यांच्या कार्यकाळात सन २०१० पर्यंत खाण वाटप सुरू का राहिले; असा सवाल आहे. आपण कोळसा मंत्रालय घेण्यापूर्वीच स्क्रीनिंग कमिटीने घेतलेल्या निर्णयानुसार ही प्रक्रिया सुरू राहिल्याचा खुलासा त्यांनी केला असला तरीही त्यावर काँग्रेस नेतृत्व फारसे समाधानी नाही. मात्र त्यांच्या राजीनाम्याची आग्रही मागणी भारतीय जनता पक्षाकडून होत असली तरीही आतापर्यंत कॉंग्रेसने त्यांची पाठराखण केली आहे.

या दोघा मंत्र्यांशिवाय खासदार विजय दर्डा, नवीन जिंदाल, माजी कोळसा राज्यमंत्री संतोष बागरोडीया या नेत्यांवर कोळसाकांडामुळे संक्रांत येऊ शकते.