भोपाळ: ठाकरे कुटुंबीय आपल्या प्रश्नांपासून दूर पळण्याचा पळपुटेपणा करीत असून त्यासाठी त्यांनी मला वेडा ठरविले आहे. असे आरोप करण्याऐवजी ठाकरे कुटुंबीय बिहारी असल्याच्या माझ्या दाव्याचे वस्तुनिष्ठ खंडन करावे; असे आव्हान काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी दिले आहे.
ठाकरे कुटुंबीय ४०० वर्षापूर्वी बिहारमधून स्थलांतरित होऊन महाराष्ट्रात आल्याचा दावा सिंग यांनी केला होता. त्यासाठी त्यांनी खुद्द प्रबोधनकार ठाकरे यांच्याच पुस्तकाचा संदर्भ दिला. मात्र शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी हा दावा फेटाळून लावत दिग्विजय सिंह ठार वेडे असल्याचा आरोप केला.
वास्तविक ठाकरे कुटुंबीय आपल्या दाव्यामुळे कोंडीत सापडले आहेत. त्यांना माझ्या दाव्याचा प्रतिवाद करता येत नाही. म्हणूनच मला वेडा ठरविण्याचा अगोचरपणा ते करीत आहेत. मात्र माझ्यासाठी हे नवीन नाही. आतापर्यंत अनेकांनी मी वेडा असल्याचे आरोप केले आहेत; असे दिग्विजय सिंह यांनी सांगितले.
ठाकरे कुटुंबियांनी आपला दावा खोडून काढावा असे आव्हानही त्यांनी दिले.