न्यायाधीशांनी तोडले अकलेचे तारे

बंगळूरू: नवर्‍यानेच जर बायकोला मारले तर त्यात एवढे काय झाले; असा सवाल तक्रारदार महिलेला करून कर्नाटकातील न्यायाधीश भक्त वत्सल यांनी अकलेचे तारे तोडले आहेत. त्यांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेऊन ऑनलाईन याचिका भारताचे सरन्यायाधीश एच. एस. कापडिया यांना पाठविण्यात आली आहे.

नवर्‍याच्या मारहाणीबाबत तक्रार करणार्‍या एका महिलेचा खटला भक्त वत्सल यांच्या न्यायालयात सुनावणीसाठी आला असता न्यायाधीश महोदयांनी त्या महिलेला पैशाची कमतरता आहे का; असा प्रश्न केला. त्यापुढे जाऊन नवर्‍याचा कामधंदा चांगला चालला असेल तर त्याने मारल्याबद्दल काय एवढी चर्चा करायची; अशी मुक्ताफळे त्यांनी उधळली.

न्यायाधीशांच्या या उद्गारामुळे महिला वकील, सर्वसामान्य महिलांबरोबरच सर्वसामान्य विचारी पुरुषही संतप्त असून त्यांच्या विरोधात सरन्यायाधीशांकडे तक्रार करण्याबरोबरच फेसबुकवर ‘रिमूव्ह जस्टीस भक्त वत्सल’ असे पेजही तयार करण्यात आले आहे.