बघता बघता मराठवाडा दहशतवादी संघटनांचा बालेकिल्ला होतो की काय असे वाटण्यासारखी स्थिती निर्माण होत आहे. याबाबत बीडने तर मराठवाड्याचे नाव बदनाम केलेच आहे पण काल नांदेडमध्ये चौघांना दहशतवादी कारवायांशी संबंध असल्याच्या संशयावरून अटक करण्यात आली आहे. या चौघांचा बंगलूरच्या अकरा जणांशी काही संबंध आहे की नाही याचा काही पत्ता लागला नाही पण त्यांना आंध्र प्रदेशतल्या काही लोकांची फूस होती असे लक्षात आले आहे. हे अतिरेकी तरुण मराठवाड्यातले आहेत. काही बीडचे तर काही नांदेडचे. पण त्यांनी त्यांच्या कारवाया मराठवाड्यात योजिलेल्या नव्हत्या. त्या त्यांना मोठ्या शहरात करायला भाग पाडण्यात येणार होते. कारण बंगलोर हे मुंबईच्या पाठोपाठ विकसित शहर म्हणून ओळखले जायला लागले असून ते दहशतवाद्यांच्या रडारवर आले आहे.
बंगलोरमध्ये २००६ साली एक स्फोट झाला होता आणि त्यात एका शास्त्रज्ञाचा मृत्यू झाला होता. नंतरच्या काळात बंगलोरमध्ये मोठा स्फोट झाला नाही पण तिथे अतिरेकी वास्तव्याला असल्याचे तरी आढळले किंवा दहशतवादी संघटनांचे धागेदोरे कोणत्या ना कोणत्या प्रकाराने या शहराशी जुळलेले आहेत असे तरी आढळले. या कटातल्या ११ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यात एका इंग्रजी तेही डेक्कन हेरल्ड सारख्या प्रतिष्ठित दैनिकाचा बातमीदार आणि एक शास्त्रज्ञ गुंतलेला आहे यावर आधी पोलिसांचा विश्वासही बसत नव्हता. हा शास्त्रज्ञ म्हणजे काही किरकोळ शास्त्रज्ञ नव्हे. संरक्षण खात्याशी सबंधित असलेल्या संरक्षण संशोधन आणि विकास या प्रतिष्ठित (डीआरडीओ) संशोधन संस्थेतला शास्त्रज्ञ आहे. असे लोक घातपाती घटना घडवण्याच्या कामात गुंतले आहेत हे पोलिसांना जाणवायला लागले तेव्हा त्यांनी आपला फास त्यांच्या भोवती आवळायला सुरूवात केली आणि हे लोक पोलिसांच्या जाळ्यात सापडले. यातला पत्रकार आणि शास्त्रज्ञ या दोघांनी दहशतवादी कारवायांच्या बाबतीतला आपला नेहमीचा युक्तिवाद फोल ठरवला आहे.
साधारणपणे असे मानले जाते की, दहशतवाद हा गरिबीत वाढत असतो. कारण दहशतवादी संघटनांचे नेते, म्होरके गरीब मुलांच्या कुटुंबातल्या आर्थिक अडचणी हेरून त्या अडचणींचे निवारण करण्याचे आश्वासन देतात आणि त्यांच्या धार्मिक भावना भडकावून त्यांना आपल्या संघटनांत ओढतात. एकंदरीत गरिबी आणि अज्ञान ही दहशतवादी संघटनांसाठी सुपीक जमीन असते असे मानले जाते पण हा समज आता चुकीचा ठरत आहे कारण इंग्रजी वृत्तपत्राचा पत्रकार आणि केन्द्र सरकारच्या नोकरीतला डीआरडीओ मधला शास्त्रज्ञही या जाळ्यात अडकलेला आहे. हे दोघेही गरीब नाहीत आणि अज्ञानीही नाहीत. या अटकेने पुन्हा एकदा देशात अशा प्रकारचे हजारो तरुण असण्याची शक्यता अधोरेखित झाली आहे.
ही कामे गावागावात निर्माण करण्यात आलेल्या स्लीपर सेलकडून करून घेतली जातात. त्यांना काही अतिरेकी संघटना नेमतात. अशी नेमणूक त्या सदस्या शिवाय कोणालाच माहीत नसते. त्यांना कोणत्या ना कोणत्या निमित्ताने पाकिस्तानात, नेपाळमार्गे पाकव्याप्त काश्मीरमध्ये किंवा आखाती देशात नेऊन प्रशिक्षण दिले की तो संघटनेत आला असे समजले जाते. त्यांना गोपनीयतेची शपथ दिलेली असते. ते एकदा या जाळ्यात ओढले गेले की त्यांच्या गावात किवा स्लीपरसेलच्या परिसरात एखादी अशी कारवाई घडवायची असेल तरच त्यांचा वापर होतो. त्यांच्यावर एखादी कामगिरी सोपविली जाते. पण त्याच्या परिसरात अशी काही कारवाई रचलीच गेली नाही तर त्याला काही काम लागत नाही. तो आपले उपजीविकेचे काम करीत राहातो. तो दहशतवादी संघटनेशी संबंधित असतो याचा कोणाला संशयही येत नाही. म्हणूनच जेव्हा त्याला एखाद्या प्रकरणात अटक होते तेव्हा त्याच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही मोठा धक्का बसतो.
आताही एक शास्त्रज्ञ आणि एक पत्रकार अशा कटात असतील याची कोणी कल्पनाही करू शकले नसते. पण स्लीपर सेल हा काय प्रकार आहे हे समजले म्हणजे त्यांच्या या सहभागाचे आश्चर्य वाटत नाही. पण देशात काही दहशतवादी हल्ले होतात तेव्हा प्रत्येक वेळा या दहशतवाद्यांना स्थानिक मदत मिळाल्याशिवाय हे हल्ले होणे शक्य नसते. ती स्थानिक मदत असेच लोक करीत असतात. नुकतीच लैला खान या नटीचा खून झाला. तो खून मालमत्तेवरून झाला पण तीही एका दहशतवादी संघटनेच्या जाळ्यात अडकली होती आणि तिने मुंबईतल्या काही ठिकाणांचे नकाशे काही संघटनांना पुरवले होते. तिच्या घरी नेहमी काश्मीरमधील लोकांचा राबता असे. त्यावरून तिच्याविषयी संशय बळावला आणि तिला घर बदलावे लागले. आपल्याला अशा घरभेद्यांपासून संरक्षण करायचे असेल तर दुबई, पाकिस्तान किंवा नेपाळला जाणार्या लोकांवर बारीक नजर ठेवावी लागेल.