अण्णा पुन्हा उतरणार मैदानात

अहमदनगर: ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आगामी दोन महिन्यात आपले भ्रष्टाचार विरोधी आंदोलन पुन्हा सुरू करणार असून भ्रष्टाचाराबाबत जनजागृती करण्यासाठी ते देशाच्या विविध भागांचा दौरा करतील; अशी माहिती हजारे यांच्या निकटवर्तीयांनी दिली.

दिल्ली येथे आंदोलनाचे राजकीयीकरण करण्याचा निर्णय घेतल्यापासून अण्णांच्या तंबूत शांतता होती. कोळसाकांड प्रकरणी एकेकाळच्या टीम अण्णाचे ज्येष्ठ सदस्य असलेल्या अरविंद केजरीवाल यांनी उग्र निदर्शने केल्यावरही एक- दोनदा सोशल मिडीयामार्फत जाहीर वक्तव्य करण्यापलीकडे अण्णांनी प्रतिक्रिया दिली नाही. या शांततेचे अनेक अर्थ काढले गेले. अण्णांचा राजकीय पक्षाच्या स्थापनेला विरोध असून टीम अण्णांच्या सदस्यांनी त्यांच्यावर दबाव टाकून हा निर्णय जाहीर करण्यास त्यांना भाग पडले; हा प्रवाद तर जुना झाला आहे.

अण्णा आता निष्क्रिय झाल्याचा अर्थ घेऊन कोळसाकांडविरोधी आंदोलनात अनेक उत्साही तरुण ‘मैं हू अण्णा’ च्या धर्तीवर ‘मै हू अरविंद’च्या टोप्या घालून सहभागी झाले. अर्थात या कार्यकर्त्यांना केजरीवाल यांनीच दटावून त्या टोप्या काढण्यास भाग पाडले. मात्र कार्यकर्त्यांमधील संदेह फारसा कमी झाल्याचे चित्र नाही.

या पार्श्वभूमीवर अण्णांनी पुन्हा सक्रीय होणार असल्याचे संकेत दिले आहेत. राजकीय पक्षाच्या स्थापनेला अण्णांचा विरोध असल्याचाही या सूत्राने इन्कार केला. अण्णा स्वत: कोणत्याही निवडणुका लढविणार नाहीत आणि कोणाच्याही प्रामाणिकपणाबाबत संदेह निर्माण झाल्यास त्याची पाठराखण करणार नाहीत; अशी अण्णांची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अण्णा नवी टीम तयार करण्याच्या दृष्टीने चाचपणी करीत असल्याचाही त्यांनी इन्कार केला.