आता लक्ष्य रणजी क्रिकेटकडे: लक्ष्मण

बंगळूरू: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय आपण योग्य वेळी घेतला असून आता हैदराबाद संघासाठी रणजी क्रिकेट खेळण्याकडे लक्ष केंद्रित करणार असल्याचे व्ही. व्ही. एस. लक्ष्मण याने सांगितले.

बंगळूरू येथे न्यूझीलंड संघाविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी सामन्याच्या तिसर्‍या दिवशी चहापानाच्या दरम्यान भारतीय क्रिकेट संघाने लक्ष्मणचा सन्मान केला.

यावेळी बोलताना लक्ष्मणने आपल्या निवृत्तीच्या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त केले. देशासाठी खेळणे ही बाब नेहेमीच अभिमानास्पद असते. मात्र युवा खेळाडूंना संधी देण्यासाठी निवृत्त होण्यासाठी मी निवडलेली वेळ योग्यच आहे; अशा भावना त्याने व्यक्त केल्या. माझ्या राज्यासाठी काही योगदान देणे हे माझे कर्तव्य आहे. मात्र सन २००० पासून मी हैदराबाद संघातून खेळू शकलो नाही. त्यामुळे यापुढे हैदराबादसाठी रणजी क्रिकेट खेळण्याची माझी इच्छा आहे; असेही लक्ष्मण म्हणाला.