भाजप सदस्यांना संसदेबाहेर फेका: अय्यर

नवी दिल्ली: बर्‍याच दिवसापासून वादग्रस्त असण्यापासून ‘वंचित’ राहिलेल्या काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांना कोळसा खाण घोटाळ्याच्या मुद्द्यावरून संसद ठप्प झाल्यावर पुन्हा कंठ फुटला आहे. संसदेत गदारोळ करणार्‍या भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांना संसदेबाहेर फेकून द्यावे; असा मौलिक सल्ला त्यांनी दोन्ही सभागृह अध्यक्षांना दिला आहे.

मणिशंकर अय्यर आणि वाद यांचे अतूट नाते आहे. काँग्रेस पक्ष ही सर्कस असून पक्षातील प्रत्येक जण या सर्कशीत सामील होऊ इच्छितो; असे विधान त्यांनी पूर्वी आपल्याच पक्षाबाबत केले होते.

आता संसदेत गोंधळ घालणार्‍या विरोधी पक्षाच्या सदस्यांना लक्ष्य करून अय्यर यांनी आपल्या पक्षाला तरी सोडले म्हणून काँग्रेस जनांनी सुस्कारा सोडला असेल.