हाजी अली दर्गा

मुंबईचा हाजी अली दर्गा….हे सिनेतार्‍यांपासून ते सर्वसामान्यांपर्यंत सर्वांनाच भक्तिभावाने नतमस्तक करायला लावणारे ठिकाण. जिथे तुम्ही कोणत्या धर्माचे हा भेद आपसूक गळून पडतो आणि तुम्ही केवळ एक माणूस म्हणून तिथे नतमस्तक होता हे हाजी अलीचे वैशिष्ट्य.
haji-ali-dargah

(फोटो सौजन्य – Collector Mumbai)
हाजी अलीचा दर्गा दुरून बघतांना एखादा मोती अथांग सागरात तरंगतोय असे वाटते. किंबहुना त्याची निर्मिती त्याच सौंदर्यदृष्टीने करण्यात आली आहे. महालक्ष्मी रेसकोर्सच्या विरूद्ध दिशेला समुद्रात एका बेटावर हाजी अली दर्गा आहे. या बेटापर्यंत जाण्यासाठी अगदी छोटी पायवाट आहे. ही पायवाटही जेव्हा समुद्राला भरती येते तेव्हा दिसेनाशी होते आणि हाजी अली दर्ग्याची वास्तू जणू समुद्रात अधांतरी तरंगत असल्यासारखी वाटते.
haji-ali-dargah1

(फोटो सौजन्य – Collector Mumbai)
’इथे येणे’ हा एक वेगळाच अनुभव आहे. समुद्रातच चालत जाणे ही कल्पना तशी लहान मोठ्यांना सुखावणारी. मस्त वारे वाहत असतांना इथे यायचे ते सगळी मरगळ घालवायलाच. हाजी अली दर्ग्याची ही मूळ वास्तू सन १४३१ मध्ये बांधण्यात आली होती. त्यानंतर त्यामध्ये वेळोवेळी अनेक बदल करण्यात आले. आणि आज आपण जी बघतो ती वास्तू फार तर १०० वर्षे जुनी असावी. ’हाजी अली’ या सुफी संताच्या स्मृतीप्रित्यर्थ ही वास्तू बांधण्यात आली आहे.
haji-ali-dargah2
यासंबंधी प्रचलित असलेल्या कथेनुसार ’हाज अली’ एक अतिश्रीमंत व्यापारी होते. त्यांनी भौतिक सुखे नाकारून अध्यात्मिक सुख शांतीसाठी मक्केची यात्रा केली. या यात्रेदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. आणि आश्चर्य म्हणजे त्यांची चादर वाहत येवून किनार्‍याला लागली. म्हणून इथे दर्गा बांधण्यात आला.
haji-ali-dargah2
दर्ग्याकडे जाणार्‍या पाऊलवाटेवरून चालत गेलो की, एका कोरीव काम केलेल्या प्रवेशद्वारातून आपण आत जातो. संगमरवरी फरशा बसवलेल्या भव्य प्रांगणाच्या मध्यभागी दर्ग्याची मुख्य वास्तू आहे. या दर्ग्यामध्ये भारतीय आणि अरेबिक वास्तूशैलीचा सुरेख संगम आढळतो.
haji-ali-dargah3
अनेक चित्रपटांमधून आपण हाजी अली दर्ग्याचे दर्शन घेतलेले असले तरी, प्रत्यक्ष तिथे गेल्यावर एक वेगळाच अनुभव येतो. शेकडो भक्तगण लाल, हिरव्या, चमकणार्‍या चादरी कबरीवर चढवायला आणतात. सूफी भजनांचा अधूनमधून येणारा आवाज वातावरण अधिक भक्तिमय करतो. या कबरी भोवती चारही बाजूंनी चांदीची चौकट आहे. ज्याला सुंदर नक्षीकाम केलेल्या खांबांचा आधार आहे. त्या खांबांवर लाल, निळे, हिरवे, पिवळे आरसे लावून सुरेख नक्षीकाम करण्यात आले आहे. वरवर बघता हे ते फक्त नक्षीकाम आहे, असे वाटू शकते. पण प्रत्यक्षात ती अरेबिक भाषेत लिहिलेली अल्लाची ९९ नावे आहेत. हे कळल्यावर कुणीही थक्क होते.
haji-ali-dargah5
सध्या अस्तित्वात असलेल्या दर्ग्याची इमारत ही काँक्रिटची आहे. खार्‍या वार्‍याने काही ठिकाणी या इमारतीचा मूळ भाग नादुरूस्त झाला आहे. हाजी अली दर्गा ट्रस्टने नवीन इमारतीचे बांधकाम करण्याचे निश्चित केले आहे. दर्ग्याच्या मूळ जडणघडणीत फारसा फेरफार न करता आजच्या गरजा, भक्तांची होणारी गर्दी लक्षात घेऊन हाजी अली ट्रस्टने योग्य ते बदल करण्याचे ठरविले आहे. येत्या दोन वर्षात या दर्ग्याचे नूतनीकरण होणे अपेक्षित आहे. सध्या या दर्ग्याला जवळपास ८० हजार लोक दर आठवड्याला भेट देतात. ही संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.
haji-ali-dargah4
जिथे माणसाचे माणूसपण फक्त लक्षात घेतले जाते, अशी सगळीच ठिकाणे लोकप्रिय होतात मग त्याला हाजी अली तरी कसे अपवाद असेल ? आपणही याच भावनेने या दर्ग्यात नतमस्तक व्हायचे. संध्याकाळ दाटून आली असेल तर  दूरवरून ’हाजी अली पिर हाजी अली’ असे वातावरण भेदून जाणारे सूर कानावर नक्कीच पडतील.