राष्ट्रीय लोकशाही आघाडी एकसंधच: शरद यादव

नवी दिल्ली: कोळसा खाण घोटाळा प्रकरणी पंतप्रधानांचा राजीनामा मागण्याबाबत राष्ट्रीय लोकशाही आघाडीत कोणतेही मतभेद नसून संयुक्त पुरोगामी आघाडीच्या काळात केलेले खाण वाटप रद्द करावे आणि पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा; या आमच्या एकमुखी मागण्या आहेत; असे रालोआचे निमंत्रक शरद यादव यांनी गुरुवारी स्पष्ट केले.

भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांच्या अध्यक्षतेखाली आघाडीतील घटक पक्षांची बैठक पार पडली. या बैठकीला सर्व घटक पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना यादव यांनी कोळसा खाण घोटाळा प्रकरणी धोरणाबाबत रालोआमध्ये मतभेद असल्याचा स्पष्ट शब्दात इन्कार केला.

दोन कोळसा खाणींच्या वाटपाबाबत केंद्रीय मंत्री सुबोधकांत सहाय यांनी पंतप्रधानांना चिठ्ठी लिहिल्याबाबत बोलताना यादव म्हणाले की; सुबोधकांत सहाय यांनी पंतप्रधानांना चिठ्ठी लिहून खाण देण्याबद्दल शिफारस केली आणि ती तातडीने दुसर्‍याच दिवशी मान्यही करण्यात आली.

कोळसा खाण वाटप रद्द करणे आणि पंतप्रधानांनी या घोटाळ्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देणे या दोन मागण्या मान्य झाल्यानंतरच संसदेत कामकाज होऊ शकेल; असा इशाराही यादव यांनी दिला.