अण्णांच्या आंदोलनाची दिशा

गेल्या वर्षी देशातल्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनावरून बराच वाद होत असे. काही काँग्रेसी नेते अण्णा आणि रामदेवबाबा यांच्या विषयी काही बाही बोलत असत पण त्यांना ज्येष्ठ नेते झापत असत आणि त्यांनी या दोघांविषयी अनादराने बोलू नये अशी तंबी देत असत. अण्णा आणि बाबा यांनी भ्रष्टाचाराच्या विरोधात आंदोलन पुकारले असल्याने आपल्याला त्यांचा राग येत असला तरीही तो आपण असा अनादराने बोलून व्यक्त करता कामा नये असे या ज्येष्ठ नेत्यांचे म्हणणे असे. कारण या दोघांविषयी लोकांच्या मनात आदर आहे हे त्यांना माहीत होते. आपण अण्णा आणि बाबा यांच्या विरोधात बोललो तर जनता आपल्यावर नाराज होईल आणि ती आपल्या विरोधात जाईल अशी भीती त्यांना वाटत असे. या आंदोलना विषयी आणि आंदोलकांच्या विषयी लोकांच्या मनात आदर असल्याचे हे लक्षण होते. या आदरापोटीच रामदेवबाबा यांच्या स्वागतासाठी चार चार मंत्री विमानतळावर गेले होते. असे हे दोन नेते एकत्र येतील असे जून मध्ये दोघांनीही जाहीर केले होते पण, आता त्यांच्या आंदोलनाचे नेमके काय चालले आहे याचा पत्ताही लागत नाही आणि ते विघटित होत चालले आहे.

कोळसा खाण भ्रष्टाचाराचे निमित्त करून भारतीय जनता पार्टीने संसदेची दोन्ही सभागृहे बद पाडली आहेत. या प्रश्नावर तसे अण्णा फार काही बोलत नाहीत पण टीम अण्णाचे सदस्य अरविद केजरीवाल यांनी कोळशाच्या प्रकरणाचा सविस्तर अभ्यास करून त्यावर अनेकदा आपले म्हणणे मांडले आहे. भाजपाचे नेते या प्रकरणात केवळ काँग्रेसला जबाबदार धरत आहेत काँग्रेसचे नेते हात वर करत आहेत आणि यात काही भ्रष्टाचार नाही अशी भूमिका घेत आहेत. मात्र यात काही काळेबेरे असेलच तर त्या बाबत भाजपालाही दोषी धरावे असे त्यांनी स्पष्ट केले आहे. केजरीवाल यांनी मात्र सर्वापेक्षा वेगळा पवित्रा घेतला आहे. त्यांनी या संबंधात काँग्रेस सोबत भारतीय जनता पार्टीलाही दोषी धरले आहे आणि दोन्ही पक्षांच्या विरोधात आंदोलन सुरू केले आह काल त्यांनी पंतप्रधानांच्या घराला घेराव घालण्याचा प्रयत्न केला. तिथे त्यांचे शेकडो अनुयायी जमले होते. केजरीवाल हे टीम अण्णाचे सदस्य असले तरीही त्यांची आपली इंडिया अगेन्स्ट करप्शन या नावाची वेगळी संघटना आहे. तिने अण्णांना वगळून आपले स्वतंत्र आंदोलन सुरू केले आहे.

अण्णांनी अशा प्रकारचा घेराव करण्याचा आदेश दिलेला नसला तरीही अरविंद केजरीवाल यांनी आपल्या संघटनेच्या वतिने स्वतंत्रपणे हा घेरावचा कार्यक्रम हाती घेतला. केजरीवाल यांच्या अनुयायांनी पंतप्रधानांच्या पाठोपाठ काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याही निवासस्थानाला घेराव घालण्याचा प्रयत्न केला. या दोन्ही ठिकाणी मोठा बंदोबस्त होता त्यामुळे घेराव आंदोलन यशस्वी झाले नाही. पोलिसांनी पाण्याचे फवारे आणि नंतर अश्रुधूराचा वापर करून घेराव घालणार्‍या कार्यकर्त्यांना हुसकावून लावले. आता केजरीवाल हे नितीन गडकरी यांच्याही घराला घेराव करणार आहेत. या आंदोलनात ते एकटे आहेत. टीम अण्णाच्या आणखी एक सदस्या किरण बेदी यांनी या घेरावला पाठिबा दिला आहे पण त्यांनी भाजपाला दोषी धरण्यास विरोध केला आहे. आता या स्थितीत भाजपाला दोषी धरण्यात काही अर्थ नाही असे त्यांचे म्हणणे आहे. कारण हा कथित घोटाळा काँग्रेसने केला आहे आणि त्यांनाच जबाबदार धरले पाहिजे असे त्यांचे मत आहे. एकंदरीत टीम अण्णात या बाबत तीन प्रकारची मते आहेत. अण्णांनी केवळ कोळसा घोटाळ्यात लक्ष घालण्याबाबत उदासीनता दाखवली आहे. केजरीवाल भाजपालाही दोषी धरत आहेत तर किरण बेदी केवळ काँग्रेसला दोषी धरावे या मताच्या आहेत.

हे मतभेद साधे नाहीत. केजरीवाल या आंदोलनातून आपले वेगळे नेतृत्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. काल त्यांनी आपल्या आंदोलनाची सुरूवात केली तेव्हा त्यांचे कार्यकर्ते गांधी टोपी घालून आले होते. तशा टोप्या अण्णांच्या आंदोलनात वापरण्यात येतात. गतवर्षी अशा टोप्यांची लाट आली होती. केवळ आंदोलनात सहभागी होणारे लोकच नाही तर देशाच्या अनेक गावागावांत अनेक अण्णा समर्थक अशा टोप्या घालून फिरत होते आणि त्या टोप्यांवर मै अण्णा हुँ असे लिहिलेले असे. अण्णांनी आपल्या एका भाषणात तसे म्हटले होते. हे आंदोलन एकटा अण्णा हजारे चालवणार नाही. येथे जमलेल्या जमावातला प्रत्येक जण अण्णा आहे असे ते म्हणाले होते. त्यातून या मै अण्णा हुँ टोपीची टूम निघाली होती. पण आता अरविद केजरीवाल यांच्या या घेराव आंदोलनात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी परिधान केलेल्या टोप्यांवर मै अरविद हुँ असे लिहिलेल्या टोप्या होत्या. यातून अनेकांना अरविद केजरीवाल टीम अण्णात आपले एक वेगळे स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत असे दिसायला लागले आहे. भ्रष्टाचाराच्या विरोधातले आंदोलन तीन चार भागात विघटित झाले आहे.