पुण्यातील अवयव प्रत्यारोपण केंद्र पुनर्जिवित होणार

पुणे दि.२७-राज्यशासनाने पुण्यातील झोनल ट्रान्सप्लांट कोऑडिनेशन सेंटर पुनर्जिवित करण्याचा निर्णय घेतला असून त्याचबरोबर अमरावती आणि नाशिक येथे नवी केंद्रेही सुरू करण्याचे ठरविले आहे असे राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव टी.सी.बेंजामिन यांनी स्पष्ट केले आहे.

याविषयी मिळालेल्या माहितीनुसार पुण्यात २००४ साली अवयव प्रत्यारोपण सहकार्य  केंद्र सुरू करण्यात आले मात्र त्याविषयी पुरेशी जनजागृती झाली नाही तसेच या केंद्राचे काम सुरळीत चालावे यासाठी आवश्यक सोयीसुविधाही पुरविल्या गेल्या नाहीत. परिणामी गेल्या आठ वर्षात या केंद्राकडे केवळ ५० मूत्रपिंडे आणि ३ यकृतेच उपलब्ध होऊ शकली. मृतदेहातील चांगल्या स्थितीतील अवयव दान करण्याकडे लोकांची प्रवृत्ती वाढावी आणि या चळवळीला चालना मिळावी या उद्देशाने पुण्यातील केंद्राला पुनर्जिवीत करण्यात येत आहे. या केंद्राशी पुण्यातील आठ प्रमुख हॉस्पिटलनी सहकार्य करार केला असून या सर्व प्रतिनिधींची बैठक लवकरच घेण्यात येणार असल्याचेही समजते. मृत देहातील अवयवांचे दान करून त्या अवयवांची गरज असलेल्या दुसर्‍या जीवाला नवजीवन मिळू शकते याबाबतची जागृतीही करण्याचे काम हाती घेण्यात येत आहे.

बेंजामिन म्हणाले की मरणोत्तर अवयवदानाप्रमाणेच मेंदू पेशी मृत झालेल्या व्यक्तीचे अवयवही गरजू पेशंटसाठी वापरता येतात मात्र अजून आपल्याकडे त्यासंबंधी अशा पेशंटच्या नातेवाईकांना पुरेशी कल्पना नसते असे आढळले आहे. मेंदू पेशी मृत झालेल्या अनेक केसेस रूग्णालयात अथवा घरातही आढळतात. मात्र जोपर्यंत डॉक्टर मेंदू पेशी मृत झाल्याचा अधिकृत अहवाल देत नाहीत तोपर्यंत त्या देहातील अवयव काढून दुसर्‍या रूग्णासाठी वापरता येत नाहीत असा कायदा आहे. त्यामुळे मेंदू पेशी मृत असलेल्या रूग्णांच्या नातेवाईकांनाही या बाबत कल्पना देणे आणि त्यासंबंधीची जनजागृती करणे हाही या मागचा हेतू आहे. पुण्यातील केंद्र सध्या केइएम रूग्णालयाच्या जागेतच असून तेथे केवळ याच कामासाठी स्वतंत्र कर्मचारी वर्ग नाही. ही गैरसोय दूर करण्यासाठी केंद्राला स्वतंत्र जागा आणि स्वतंत्र कर्मचारी वर्ग उपलब्ध करून दिला जाणार आहे.

वाहन परवाना देतानाच संबंधित महिला अथवा पुरूष चालकांच्या परवान्यातच त्यांची अवयव दान करण्याची परवानगी असल्याचा कॉलम अॅड करण्यासंबंधी राज्य शासन विचार करत आहे. परवाना देताना हा कॉलम भरून देणे बंधनकारक करावे असा विचार असून दुर्देवाने अपघातात वाहनचालकाचा मृत्यू ओढवलाच तर नातेवाईकांच्या परवानगीची वाट न पाहता चालकाचे उपयुक्त  अवयव गरजूंना तातडीने पुरविणे त्यामुळे शक्य होणार आहे असेही बेंजामिन यांनी सांगितले. या संबंधी केंद्राशी सल्लामसलत करून अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.