कोल्हापूर: व्ही. शांताराम यांच्या ‘प्रभात’ नंतर मराठी चित्रपटसृष्टीच्या अभिमानाचे केंद्र बनलेल्या चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांच्या जयप्रभा स्टुडिओची अखेर विक्री करण्यात आली. मराठी कलासृष्टीत कलापूर असे नामाभिधान लाभलेल्या कोल्हापुरातील अनेक रसिकांनी या व्यवहाराबद्दल हळहळ व्यक्त केली.
छत्रपती राजाराम महाराजांनी सन १९३८ मध्ये जयप्रभा स्टुडिओची उभारणी केली. भालजी पेंढारकर यांनी सन १९४४ मध्ये तो खरेदी केला. आपल्या ऐतिहासिक आणि सामाजिक चित्रपटांनी मराठी चित्रपटसृष्टीला दिशा देणार्या अनेक भव्य चित्रपटांची निर्मिती या स्टुडिओत झाली. अनेक महान कलाकार आणि तंत्रज्ञ या स्टुडिओने मराठी चित्रपटसृष्टीसाठी घडविले. भालजी पेंढारकरांच्या पश्चात त्यांच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठीच गानकोकीळा लता मंगेशकर यांनी हा स्टुडिओ खरेदी केला. मात्र त्यांनी या स्टुडिओची ११ कोटी रुपयांना विक्री केली आहे.
मंगेशकर कुटुंबियांचे देशप्रेम आणि कलेच्या क्षेत्रात त्यांचे योगदान अतुलनीय आहे. हा स्टुडिओ त्यांच्या खाजगी मालकीचा असल्याने तो विकण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे; हे मान्य करूनही अनेक कोल्हापूरकर रसिक या व्यवहाराने कष्टी झाले आहेत.