राज्याला पुरेसा नैसर्गिक वायू मिळावा: मुख्यमंत्री

नवी दिल्ली: महाराष्ट्र भारनियमनमुक्त करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असून त्यासाठी गॅसचा तुटवडा भासू नये म्हणून केंद्राने लक्ष घालावे’ अशी विनंती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पेट्रोलियम मंत्री जयपाल रेड्डी यांच्याकडे केली.

दुष्काळाला तोंड देण्यासाठी केंद्राकडून निधी उपलब्ध व्हावा; या मागणीसाठी दिल्लीत गेलेल्या मुख्यमंत्र्यांनी रेड्डी यांचीही भेट घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री आणि उर्जा मंत्री अजित पवार यांच्यासह राज्याचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

राज्यात दुष्काळी परिस्थिती असताना पाण्याचे साठे मर्यादित असून उपलब्ध पाणी पिण्यासाठी राखून ठेवणे आवश्यक बनले आहे. त्यामुळे जलविद्युत प्रकल्पातून क्षमतेएवढी वीज निर्मिती होत नाही. कोळशावर चालणार्‍या औष्णिक विद्युत प्रकल्पांची संख्या राज्यात मोठी असली तरी त्यांना पुरेशा प्रमाणात कोळसा उपलब्ध होत नाही. या पार्श्वभूमीवर राज्याला नैसर्गिक वायूवर आधारित वीज निर्मितीखेरीज अन्य पर्याय उपलब्ध नाही. मात्र दाभोळ विद्युत निर्मिती प्रकल्पाला पुरेसा नैसर्गिक वायू उपलब्ध होत नाही; याकडे मुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्र्यांनी रेड्डी यांचे लक्ष वेधले.
महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती आणि अपुरा वीज पुरवठा या समस्यांबाबत केंद्र शासन गंभीर असून राज्याला पुरेशा प्रमाणात नैसर्गिक वायूचा पुरवठा करण्यासाठी योग्य ते पावले उचलली जातील; असे आश्वासन रेड्डी यांनी यावेळी दिले.