’बल्क एसएमएसमागे पाकचा हात‘

नवी दिल्ली, २० ऑगस्ट-भारतातील ईशान्य नागरीकांमध्ये दहशत पसरविण्यासाठी आणि फूट पाडण्यासाठी पसरवले गेलेले एसएमएस आणि एमएमएस पाकिस्तानमधून पाठविण्यात आले, असे गृहसचिव आर. के. सिंग यांनी सांगितले.

हे एसएमएस, एमएमएस प्रसारित करणारया वेबसाईट ब्लॉक केल्या गेल्या आहेत आणि यासंदर्भात पाक सरकारकडे भारत निषेध नोंदवत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. पाकिस्तानातील दहशतवादी शत्त*ींनी भारताविरूद्ध पुकारलेले हे सायबर वॉर असल्याचे मानले जात आहे.
आसाममधल्या घटनांनंतर केवळ अफवांमुळे मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण झाली. त्यामुळे बल्क एसएमएस आणि एमएमएसवर बंदी घालण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

वेगवेगळ्या कंपन्यांमार्फत रोज १५ ते २० कोटी एसएमएस पाठवले जातात. त्यातले बहुतांशी प्रमोशन आणि आर्थिक व्यवहारांशी संबंधित असतात. बल्क एसएमएस टाळण्यासाठी ग्राहक ‘डू नॉट डिस्टर्ब‘ नोंदणी करू शकतो. अर्थात बँकिंग, शिक्षण, आरोग्य असे आवश्यक एसएमएस वगळता अन्य एसएमएस टाळण्याचा पर्यायही ग्राहकांकडे आहे. पण याची योग्य माहिती नसल्याने समाजकंटक फायदा घेऊन उपद्रवी बल्क एसएमएस पाठवतात. पण बंदी घालण्यापेक्षा एसएमएस पाठवूनच लोकांमधील गैरसमज दूर करायला हवेत, असे ही सेवा पुरवणार्‍यांना वाटते.

यापूर्वी अयोध्या प्रकरणी कोर्टाच्या निकालानंतर बल्क एसएमएसवर सरकारने बंदी घातली होती. आता आसाम हिंसाचारानंतर निर्माण झालेल्या अफवांच्या दहशतीमुळे सरकारला पुन्हा बल्क एसएमएसवर बंदी घालावी लागली आहे. बंदी हा कायम स्वरुपी तोडगा होऊ शकत नसल्याने अभ्यास करून गैरवापर टाळण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत, असे मतही व्यत्त* केले जात आहे.