यमुनोत्री – खडतर प्रवासानंतरचा आनंदानुभव

गंगोत्रीच्या पाठोपाठ नांव येते ते यमुनोत्रीचे. हिमालयातील चारधाम यात्रेतील हे महत्त्वाचे स्थळ. हृषीकेशपासून उत्तरकाशी ला यायचे आणि तेथून यमुनोत्रीसाठी रवाना व्हायचे. उत्तरकाशी-धरासू -यमुनोत्री असा हा खडतर प्रवास आहे. हिमालयातील प्रवास मुळातच अवघड त्यातील यमुनोत्रीचा तर विशेष अवघड. आपण यमुनोत्री असा उच्चार करतो तर उत्तरेकडे जमुना किंवा जमुनोत्री असा उच्चार केला जातो.समुद्रसपाटीपासून साधारण ३२०० मीटर ऊंचीवरचे हे स्थान.
Yamunotri1
बडकोटपासून साधारण २० किमीवर लागणारे लाखामंडल थोडा वाकडा रस्ता करून पाहायलाच हवे असे ठिकाण. अवघड घाट रस्त्याने गेल्यानंतर डोंगरात कौरव पांडवांच्या असंख्य मूर्ती दिसतात. येथील मंदिर पांडवांनी बांधल्याचे सांगितले जाते. मंदिर अतिशय प्राचीन आणि दरवाज्यावर बारीक कोरीवकाम केलेले आहे. शेजारीच उघड्यावरच असलेले प्रचंड शिवलिंग म्हणजे नवलच आहे. या शिवलिंगावर पाणी ओतले की ते आरशासारखे पारदर्शी होते आणि आजूबाजूच्या प्रतिमा त्यात स्पष्ट उमटतात. परतीच्या प्रवासात दोन तीन किलोमीटरवर एक भुयाराचे तोंड दिसते. लाखामंडल याच ठिकाणी पांडवांना लाक्षागृहात जाळण्याचा प्रयत्न झाला होता आणि या भुयारातून ते सुखरूप सुटून गेले अशी कथा सांगितली जाते.
Yamunotri2
बडकोटपासून पुढे ब्रह्मखाल नावाचे एक छोटे खेडे किवा वस्ती आहे. येथे जमदग्नीचे मंदिर आणि कल्पवृक्ष पाहायला मिळतो. संपूर्ण रस्ता डोंगराळ असला तरी या गावाजवळ शेती पाहायला मिळते. जंगलाची सोबत कुठेच सुटत नाही. नंतर लागते हनुमान चट्टी. येथे वाहने उभी करता येत नाहीत म्हणून सयानचट्टीला खाली वाहने उभी केली जातात. हनुमानचट्टी छोटीशीच जागा असून यमुनोत्रीला जाण्यासाठी येथे मुक्काम करता येतो. येथे सपाट जागा अगदी कमी. त्याच्यापुढे पाच किमीवर जानकीचट्टी आहे. येथेही मुक्काम करता येतो. हनुमानचट्टीपासून खासगी वाहने पुढे नेता येत नाहीत. त्यामुळे हनुमानचट्टीपासून जानकीचट्टीपर्यंत जीपने व नंतर पायी अथवा घोडा, कंडीदंडी, डोली असा प्रवास करून यमुनोत्री गाठायचे. भल्या पहाटे निघावे लागते. जानकीचट्टीपासून वर सहा किमी अंतर चढून गेल्यानंतर यमुनेचे देऊळ आहे.

यमुनोत्री हा यमुनेचा उगम मानला जातो मात्र प्रत्यक्षात उगम आणखी उंचावर आहे. तेथेपर्यंत जाणे अशक्यच आहे. यमुना मंदिर टेहरी नरेशमहाराज प्रतापशाह यांनी बांधल्याचे सांगितले जाते. काळ्या पाषाणातील यमुनेची देखणी मूर्ती आणि शेजारी पांढर्‍या संगमरवरातील गंगेची मूर्ती आहे. मंदिराबाहेर गरम पाण्याची कुंडे असून भाविक तेथे स्थान करतात. सूर्यकुंडातील पाणी तर उकळते असून या कुंडात पुरचुंडीत बांधून तांदूळ अथवा बटाटे सोडतात. भात व बटाटे शिजून निघतात. हा प्रसाद म्हणून ग्रहण केला जातो. येथे राहण्याची व्यवस्था नसल्याने एका दिवसांत दर्शन घेऊन परतावे लागते. जाण्याचा रस्ता अतिशय बिकट आणि खडतर आहे.एका बाजूला उंच डोंगर तर दुसरीकडे खोल दरी. मार्ग अतिशय अरूंद त्यामुळे जीव मुठीत धरूनच हा प्रवास करावा लागतो. शिवाय उंचावर असल्याने हाय अल्टीट्यूडचा त्रास होऊ शकतोच.
Yamunotri-temple
या ठिकाणची कथा अशी सांगतात की यमाची बहीण यमुना. भाऊबीजेदिवशी यम ओवाळणी घालायला यमुनेकडे गेला तेव्हा तिने भावाला म्हणजे यमाला सांगितले की लोकांचे प्राण हरण करण्याचे काम सोडून दे. यम हे कसे मान्य करणार? मग शेवटी निदान भाऊबीजेच्या दिवशी तरी या कामाला सुट्टी घे असे यमुनेने सांगितले आणि ती म्हणाली माझे दर्शन जो घेईल त्याला मृत्यूची भीती राहता कामा नये. आता ही मागणी म्हणजे यमाच्या कामात अडथळाच की. कोणीही येईल आणि यमुनेचे दर्शन घेईल हे कसे चालणार? शेवटी यमुना कोणालाही सहजी येता येऊ नये अशा या अवघड जागी येऊन राहिली. त्यामुळे यमाचे कामही सुरू राहिले आणि यमुनेची मागणीही पूर्ण झाली.

हिमालयातील ग्लेशियरमधून उंच ठिकाणाहून निघणारा यमुनेचा प्रवाह अतिशय जोरदार असून तिचा आवाज दूरवरपर्यंत एकू येतो. यमुनोत्रीचा प्रवास सुरळीत पार पडला की पुढची यात्रा सोपी होते असेही सांगितले जाते. मात्र खडतर आणि अवघड असला तरी हिमालयाच्या अंगाखांद्यावर बागडण्याचा अनुभव देणारा हा प्रवास एकदा तरी करायलाच हवा. समृद्ध निसर्ग, लहान मोठे झरे, धबधबे, विविध प्रकारची सुवासी फुले. घनदाट अरण्ये, आकाशाशी हातमिळवणी करणारे महाप्रचंड वृक्ष आणि निसर्गात भरून राहिलेले स्तब्ध शांतता. त्याची अनुभूती शब्दात कशी सांगता येणार ?