दयानंद पाटील कुटुंबिय बेपत्ता ?

पुणे दि.१ – पुण्यात १ ऑगस्ट रोजी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील एकमेव जखमी दयानंद पाटील याची पत्नी सत्यकला, अडीच वर्षाची मुलगी कीर्ती आणि पुतणी दिपाली १० ऑगस्टला घरातून निघून गेल्या असल्याचे समजते. उरळीकांचन येथील म्हेत्रे चाळीत त्यांचे बिर्‍हाड होते. दयानंद पाटील यांच्यावर ससून रूग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांची दहशतवाद विरोधी पथकाकडूनही चौकशी सुरू आहे.

यासंबंधी मिळालेल्या माहितीनुसार सत्यकला आणि दोन छोट्या मुली शेजारच्यांना ससूनमध्ये पाटील यांना भेटायला जात असल्याचे सांगून १० ऑगस्टला दुपारी बाहेर पडल्या त्या अद्याप घरी आलेल्या नाहीत. सत्यकलाचा भाऊ यावेळी तेथे आलेला होता मात्र बाहेर पडताना त्यांच्याबरोबर कोणतेही सामान, बॅग, पिशवी कांहीही नव्हते. १ ऑगस्टला स्फोटात दयानंद जखमी झाल्यापासून या कुटुंबाची कमाई एकदमच थांबली होती. मात्र शेजार्‍यांनी त्यांची पुरेपुर काळजी घेतली. अन्न व गरजेच्या वस्तू पुरविल्या. घरमालकानेही भाडे द्यायला पैसे नसले तरी फुकट रहा असे सांगितले. मात्र सत्यकला घराबाहेर पडताना कांही सांगून गेली नाही तसेच नंतरही तिच्याकडून कोणताही निरोप आलेला नाही असे शेजार्‍यांचे म्हणणे आहे. पोलिस दररोज येऊन सत्यकलेच्या ठावठिकाण्याबद्दल शेजार्‍यांकडे चौकशी करत आहेत.

सत्यकलेचा भाऊ देहूरोड येथे चाळीत राहतो. त्याने दिलेल्या माहितीनुसार सत्यकलाची तब्येत बरी नसल्याने तो तिला व मुलींना घेऊन त्याच्या घरी आला व नंतर त्याने तिला कर्नाटकातील बिदर येथे मूळ गांवी सोडले आहे. कर्नाटक पोलिसांना मात्र सत्यकलेचा ठावठिकाणा लागलेला नाही.  लोणी काळभोर पोलिस स्टेशनचे निरीक्षक सुहास गरूड यांनी सत्यकला १० ऑगस्टला चाळ सोडून गेल्याचे माहिती असल्याचे सांगून ती सध्या कोठे आहे हेही पोलिसांना माहिती असल्याचे सांगितले आहे. अर्थात तिचा ठावठिकाणा सांगण्यास आम्हाला परवानगी नाही मात्र तिच्यावर आमची पाळत आहे असेही ते म्हणाले. चाळीत रोज पोलिस चौकशी का करतात असे विचारले असता गरूड म्हणाले की या स्फोटांचा तपास विविध तपाससंस्था करत असल्याने संबंधित पोलिस तेथे चौकशी करत असावेत.