नवी दिल्ली: देशाच्या विविध भागात शिक्षण आणि नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने स्थलांतरित झालेले ईशान्य भारतीय बांधव हिंसाचाराच्या भीतीने पुन्हा आपापल्या प्रदेशाकडे जात आहेत. मात्र आधीच हिंसाग्रस्त असलेल्या आसाम आणि त्याशेजारील राज्यात त्यामुळे नव्या समस्या निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आसाममध्ये घुसखोर बांगलादेशी आणि स्थानिक आदिवासी यांच्यात मोठ्या प्रमाणावर हिंसाचार सुरू असून या हिंसाचारात सुमारे साडेचार लाख लोक बेघर झाले आहेत. या हिंसेच्या प्रतिक्रिया देशाच्या विविध भागात उमटत असून ईशान्य भारतीय लोकांवर हल्ले होत आहेत. त्यामुळे ईशान्य भारतीय स्थलांतरितांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे. प्रामुख्याने कर्नाटक, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशातून हे लोक पुन्हा आपल्या प्रदेशाकडे परतत आहेत.
गुरुवार आणि शुक्रवार या दोन दिवसातच बंगळूरू येथून तब्बल साडेसहा हजार ईशान्य भारतीय पुन्हा आपल्या प्रदेशाकडे परतले आहेत. मुंबई आणि पुण्यातून ५ हजार आणि हैद्राबाद येथून दीड हजार लोक ईशान्य भारतात परत गेले आहेत.
भयग्रस्त ईशान्य भारतवासीयांचे स्थलांतर अजूनही सुरूच आहे.