दाऊद इब्राहिमच्या पार्टीत उपस्थित होता ‘खलनायक’

नवी दिल्ली: आपण दुबई येथे दाऊद इब्राहीम याच्या घरी असलेल्या पार्टीला उपस्थित असल्याची कबुली ज्येष्ठ अभिनेता संजय दत्त यांनी वकिलामार्फत न्यायालयासमोर दिली. मात्र यापलीकडे आपला दाऊद अथवा अंडरवर्ल्डशी कोणताही संबंध नसल्याचा दावाही त्यांनी केला.

सर्वोच्च न्यायालयाच्या न्या. पी सदाशिवम आणि न्या. बी.एस.चौहान यांच्या खंडपीठासमोर संजय दत्तच्या शस्त्र बाळगल्या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे.

या सुनावणी दरम्यान संजय दत्त यांचे वकील अ‍ॅड. हरीश साळवे यांनी संजय दत्त मुंबई बॉम्बस्फोट मालिकेपूर्वी दुबईतील दाऊद इब्राहिमच्या घरी झालेल्या पार्टीला दोन चित्रपट निर्मात्यांसह उपस्थित होता; असे सांगितले. मात्र या पलीकडे दाऊद इब्राहीम, त्याचा साथीदार टायगर मेमन या आंतरराष्ट्रीय गुंडांशी आणि मुंबई बाँबस्फोट मालिकेशी संजय दत्त यांचा कोणताही संबंध नाही; असा निर्वाळा अ‍ॅड. साळवे यांनी दिला.