विलासराव देशमुख यांचे निधन

चेन्नई: केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान मंत्री विलासराव देशमुख यांचे मंगळवारी दुपारी दीर्घ आजाराने निधन झाले. ते ६७ वर्षाचे होते. त्यांच्या मागे पत्नी आणि ३ मुले, २ सुना आणि मोठे एकत्र कुटुंब असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने राज्याच्या आणि देशाच्या राजकारणातील सुसंस्कृत आणि हसतमुख व्यक्तिमत्व हरपले आहे.

प्रकृती अस्वास्थ्यामुळे विलासराव यांच्या मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात काही काळापूर्वी वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या. त्यांच्या यकृत आणि दोन्ही मूत्रपिंडाची समस्या असल्याचे निष्पन्न झाल्याने उपचारासाठी त्यांना चेन्नई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर यकृत आणि मूत्रपिंड पुनर्रोपण शस्त्रक्रिया करण्यात येणार होती.

चेन्नई येथे अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या प्रकृतीत किंचित सुधारणा झाल्याचे दिसून आल्याने व्हेंटीलेटर्स काढण्यात आले. मात्र डायलिसीस सुरू होते.

मंगळवारी सकाळी त्यांची प्रकृती अचानक बिघडली. दुपारी या हसर्‍या व्यक्तिमत्वाने जगाचा निरोप घेतला.