नवी दिल्ली दि.१३- सप्टेंबरच्या दुसर्या आठवड्यात केंद्रीय मंत्रीमंडळाचा विस्तार करण्यात येणार असून काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांचा कॅबिनेट प्रवेश निश्चित मानण्यात येत आहे. याचवेळी मंत्रीमंडळात फेरबदलची करण्यात येणार आहेत. नव्याने सामाविष्ट होणार्या राहुल गांधी यांचेकडे संरक्षण, मनुष्यबळ विकास किवा ग्रामविकास मंत्रालयाची धुरा सोपविली जाईल असे काँग्रेसमधील वरीष्ठ नेत्याकडून सांगण्यात आले आहे.
राहुल गांधी यांनी मंत्रीमंडळात सहभागी व्हावे अशी अनेक काँग्रेस नेत्यांची इच्छा आहे. गेल्या कांही दिवसांपासून राहुल गांधी नव्या भूमिकेत दिसणार अशी जोरदार चर्चाही रंगते आहे. आगामी लोकसभा निवडणुकात राहुल गांधी यांच्याकडून काँग्रेसच्या मोठ्या अपेक्षा आहेत.या सर्व बाबी लक्षात घेता राहुल गांधी यांचा मंत्रीमंडळातील समावेश नक्की मानला जात आहे.
राहुल गांधी यांच्याकडे कोणते खाते येईल याविषयीही कांही माहिती मिळत आहे. संरक्षणमंत्री अँटनी हे स्वच्छ प्रतिमेचे मंत्री मानले जातात. त्यामुळे त्यांचा कार्यभार राहुल गांधी यांच्याकडे सोपविला जाऊ शकतो. तसेच यामुळे राहुल गांधी यांचा काँग्रेस कोअर समितीतही आपोआपच समावेश होणार आहे. राहुल युवा नेते आहेत आणि युवा जनतेला काँग्रेसकडे वळविण्यासाठी त्यांच्याकडे मनुष्यबळ विकास खातेही दिले जाऊ शकते.कारण या कार्यभारमुळे राहुल शैक्षणिक क्षेत्रात अधिक कार्य करून युवापिढीला आकर्षित करू शकणार आहेत. तिसरे संभाव्य खाते आहे ते ग्रामविकास. ग्रामविकासात राहुल गांधी यांना रूची आहे. त्यांच्या आवडीचे म्हणून हे खातेही त्यांना दिले जाऊ शकते असे सांगितले जात आहे.
मंत्रीपद मिळाले तरी राहुल गांधी यांचे सरचिटणीसपदही कायमच राहील असेही सांगण्यात आले असून मुख्य म्हणजे राहुल गांधी यांनी सरकारमध्ये सामील होण्याची तयारी केली आहे ही मोठी जमेची बाजू असल्याचे वरीष्ठ नेत्यांचे मत आहे.