पुण्याची स्फोट मालिका ही ९|११ सारख्या आक्रमक तयारीनेच

पुणे बॉम्ब स्फोट मालिकेत इंडियन मुजाहिद्दिनच्या दोन दहशतवादी यासीन भटकळ आणि फय्याज कागजी यांचा सहभाग आणि त्यांच्या बॉम्बची एखाद्या लढाईत होऊ शकणारी हानी क्षमता यामुळे पुण्याची बॉम्बस्फोट मालिका हे या दहशतवादाचे अधिक आक्रमक पर्व सुरु झाल्याचे मानले जात आहे. भारतातील दहापेक्षा अधिक मोठ्या बॉम्बस्फोटात देशातील पोलिसांना यासीन भटकळ आणि फय्याज कागजी हे मुख्य आरोपी म्हणून हवे आहेत आणि त्यांच्यावर दिल्ली पोलिसांनी दहा लाख रुपयांचे इनामही जाहीर केले आहे. त्यांची छायाचित्रे स्फोटमालिकेसाठी सायकली खरेदी करत असताना एका सीसीटीव्हीमध्ये मिळाल्याने त्यांचा सहभाग स्पष्ट झाला आहे. त्यानी पुण्याच्या जंगली महाराज रोडवर ठेवलेल्या सातपैकी चार बॉम्बचा अतिशय अल्प स्फोट झाला व तीन बॉम्ब उडालेच नाहीत हा भाग निराळा. अमोनियम नायट्रेट असलेला एक बॉम्ब हा एका पेट्रोल पंपावर ठेवला होता. त्याचे छोटे स्फोटकही पेटले नाही, अमोनियम नायट्रेटही पेटले नाही व हे दोन पेटले नाही म्हणून प्रचंड पेट्रोलचा साठा असलेला एका खासदाराचा पेट्रोल पंपही वाचला. पण अमोनियम नायट्रेटचा स्फोट झाला असता तर त्या सार्याची हानी क्षमता अमेरिकेत ९|११ नावाने गाजलेल्या वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या स्फोटाइतकी मनुष्य हानी झाली असती. एखादी प्रचंड हानीकारक घटना घडली नाही म्हणून सुस्कारा सोडण्याने या प्रकरणाची सांगता होऊ शकत नाही. 

सध्या पुण्यात केंद्राची चार पाच तपास दले तपास करत आहेत आणि महाराष्ट्र सरकारचीही चार पाच दले तपास करत आहेत. तरीही ‘नेमेची येतो मग पावसाळा’ या पद्धतीनेच या स्फोटमालिकेची दखल घेतली गेली आहे असे वाटते. आरोपींच्या तपासासाठी देशात तपास पथके पाठविणे, स्फोटकांचे अवशेष तपासायला पाठवणे आणि शहरातील सहकारी गृहरचना सोसायट्या आणि मॉल यांना सीसीटीव्ही बसविण्यास लावणे यापेक्षा अधिक गांभिर्याने त्याची दखल घेतली आहे असे वाटत नाही. यासीन भटकळ यांने तर गेल्या दहा वर्षात दर वर्षी एका मोठया स्फोटात आपले अस्तित्व दाखविले आहे. पण आरोपींचा तपास आणि सीसीटीव्ही बसविणे या पलिकडे जाऊन या दहशतवाद्यांचे उद्दिष्ट काय व त्यांच्या उद्दिष्टाचे उत्तर या देशात कशा पद्धतीने देणार आहोत, हा खरे म्हणजे यातील कळीचा मुद्दा आहे. काश्मिरला स्वयंनिर्णयाचा हक्क द्या, तेथून भारतीय सेना काढून घ्या. सच्चर कमिशनचा अहवाल जसाच्या तशा लागू करा, असे काही तरी यांचे उद्दिष्ट वाटेल. पण मग जो पाकिस्तान तेथे आज साठ वर्षानंतरही हिंदूंचे सक्तीचे धर्मांतर, मुलींना पळवून नेणे आणि हिंदूंना भारतात पाठवणे हे करत आहे तो याच षडयंत्राचा भाग आहे ही वस्तुस्थिती आपणा सर्वांना माहीत आहे. बांगला देशातील घुसखोरांची आणि बोडोलँडच्या अतिरेक्यांची दंगल आसामात झाली त्याकडे लक्ष वेधण्यासाठी मुंबईत काढलेल्या मोर्चेवाल्यांनी मुंबईत दंगल केली. या सार्याची नाळ एकच आहे हे स्पष्टपणे डोळ्यासमोर ठेवल्याखेरीज याचे उत्तर सापडणार नाही.  

वास्तविक, गेल्या साठ वर्षात येथील मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणावर या देशाचा एकजिनसी भाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. सीमेवरून जेंव्हा शहीद होण्याच्या बातम्या येतात तेंव्हा त्यात मुस्लिम सैनिकांची संख्या कमी नसते. आणिबाणीच्या प्रसंगी तीही मंडळीही तेवढीच पुढे असतात हीही वस्तुस्थिती आहे तरीही येथे गेले एक हजार वर्षे सुरु असलेल्या मुस्लिम दहशतवाद ही या देशाची मोठी चिंता आहे हेही दुर्लक्षित करून चालणार नाही. या देशात गेली पासष्ट वर्षे सत्ता केलेल्यांनी अल्पसंख्यकाबाबत काही निश्चित स्वरुपाची भूमिका घेतल्याने त्या विषयावर सर्व संदर्भ घेऊन बोलण्यावर व लिहिण्यावर मर्यादा येतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, एक हजार वर्षापूर्वी आक्रमण केलेला गझनीचा महंमद आणि आज हल्ले करत असलेले यासीन भटकळ आणि फय्याज कागजी यांचे मुख्यालय एकाच ठिकाणी आहे. त्या काळी त्याला गझनी म्हणत आणि आज त्याला अल्कायदाचे फिरते मुख्यालय म्हणतात; पण परिसर तो एकच आहे हे विसरले तर या स्फोटमालिकांचा उद्दिष्ट स्पष्ट होणार नाही. पाकिस्तानात आजही गेल्या हजार वर्षाच्या इतिहासाला काल घडलेल्या इतिहासाप्रमाणे प्रेरणेचा भाग मानले जाते. आजही महंमद बिन कासीम, नंतर महंमद घोरी, कुतुबुद्दिन ऐबक, महाराष्ट्रावर हल्ले केलेला अल्लाउद्दिन खिलजी आणि नंतरची मोंगलाची म्हणजे बाबर ते औरंगजेब यांची नावे प्रत्येक रस्त्याला, प्रत्येक घराला आणि प्रत्येक स्फोटकाला दिली जातात तर त्यांच्या प्रेरणेने चालणार्या या सार्या कारवायांचा आपल्याला तरी विसर पडून कसा चालेल! 

पुण्याच्या स्फोट मालिकेत यासीन भटकळ आणि कागजी यांचाच सहभाग

पुण्यापुरतेच आज संदर्भ द्यायचे झाल्यास जर्मन बेकरीचा स्फोट आणि जंगली महाराज रोडवरील दि.१ ऑगस्टची मालिका यातून पुण्यात जी सुरक्षा यंत्रणा वाढविण्यात आली आहे त्याची म्हणजे पिंपरी चिंचवड, पुणे शहर आणि देहू आळंदी, दौंड, तळेगाव या भागातील एकूण साठ लाखाची लोकसंख्या यातून जवळ जवळ एक लाख कर्मचारी, ज्यात शासकीय कर्मचारी, निवृत्त लष्करी सुरक्षा रक्षक, आणि मॉल, महाविद्यालये, विमानतळ, गृहरचना संस्था यांचे रखवालदार यांचा समावेश आहे, तेवढे जरी दहशतवाद्यांच्या संघटित हल्ल्याशी लढण्याची सज्ज झाले तरी बरेचसे काम होण्यासारखे आहे. पण या एक लाख लोकांना सशस्त्र कारवाईचे आणि गुप्तहेर कामाचे प्रशिक्षण दूर राहो, पण साधे सिव्हिल डिफेन्सचे जरी प्रशिक्षण मिळाले तरी ते अधिक प्रभावी काम करू शकतील.  

पण येथील किंवा दिल्लीचे शासन असा निर्णय घेण्याच्या मानसिकतेत असू शकते का यावर ‘नाही ’ हेच उत्तर पुढे येईल. गेल्या एक हजार वर्षात ज्या आक्रमकांनी येथे बळाच्या आधारे राज्य केले, त्यांच्या पुरस्कर्त्यांच्या पाठिंब्याखेरीज येथील शासन चालणार नसेल तर भारतात होणार्या सर्व स्फोटमालिकांचा तपास लागला तरी अंतीम विजय दहशतवाद्यांचाच असणार हे निश्चित आहे. कारण गेल्या पासष्ट वर्षांचा तसा इतिहास आहे. अर्थात अशा घटनामुळे ‘आता कसे व्हायचे ’असे वाटून बुचकळ्यात पडण्याचे कारण नाही. एक हजार वर्षांचे हे आक्रमण असल्याने त्याचा प्रतिकारही तेवढ्याच संयमाने करणे आवश्यक आहे. पुण्यातील या स्फोटमालिकानंतर अनेक निवृत्त सेनाधिकारी संघटना या देशातील सुरक्षा रक्षकांना प्रशिक्षण देण्याच्या मनस्थितीत आहेत. अशाच बाबीतून यातून निश्चितपणे मार्ग निघणार आहे.