नवी दिल्ली: भारतीय बनावटीची आण्विक पाणबुडी ‘आयएनएस अरिहंत’ची बांधणी पूर्ण झाली असून लवकरंच भर समुद्रात तिच्या कामगिरीची चाचणी घेतली जाईल; अशी माहिती भारताच्या नौदलाचे प्रमुख अॅडमिरल निर्मल वर्मा यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

‘आयएनएस अरिहंत’च्या निर्मितीनंतर भारत आण्विक पाणबुड्यांबाबत स्वयंपूर्ण झाला असून ‘आयएनएस अरिहंत’ समुद्रातील चाचण्या यशस्वीपणे पार पाडेल; असा विश्वास अॅडमिरल वर्मा यांनी व्यक्त केला. आतापर्यंत भारत आण्विक पाणबुड्यांसाठी इतर देशांवर अवलंबून होता.
रशियन बनावटीच्या आयएनएस चक्र या पाणबुडीच्या भारतीय नौदलातील समावेशानंतर भारत सक्षम नौदलांच्या यादीत महत्वाच्या स्थानी पोहोचला आहे. भारतीय बनावटीच्या ‘आयएनएस अरिहंत’ची निर्मिती केल्यानंतर भारताचे स्थान अधिक बळकट झाल्याचे अॅडमिरल वर्मा यांनी नमूद केले. रशिया आणि जर्मनीने भारताला पाणबुड्या पुरविण्यास असमर्थता दर्शविल्यानंतर भारताने पाणबुडी निर्मितीचे आव्हान स्वीकारले आणि ते यशस्वी करून दाखविले; असेही एडमिरल वर्मा म्हणाले.
भारतीय नौदलाची गुप्त माहिती चीनने मिळविल्याच्या प्रकरणाची चौकशी पूर्ण झाली असून याला जबाबदार असलेल्या अधिकारी आणि कार्माचार्यंवर कडक कारवाई केली जाईल; असेही अॅडमिरल वर्मा यांनी सांगितले.