मेरी कोमच्या सुवर्णपदकातील अडथळा

लंडन,८ ऑगस्ट-मेरी कोमने सलग दोन सामने जिंकून लंडन ऑलिम्पिकमध्ये आपले पदक निश्चित केले आहे. मात्र बुधवारी बॉक्सिंग रिंगमध्ये तिच्यासमोर निकोला अॅडम्सचे कडवे आव्हान असणार आहे.

मेरी कोम मे मध्ये जागतिक विजेतेपदाच्या क्वार्टर फायनलमध्ये ब्रिटनच्या या बॉक्सरकडून पराभूत झाली होती. त्यामुळे मेरी कोमला आता पराभवाचा बदला चुकता करण्याची चांगली संधी प्राप्त झाली आहे. दोघांची क्षमता पाहता हा सामना कमालीचा रोमांचक होण्याची शक्यता आहे.

वयाच्या १३ व्या वर्षी पहिल्यांदा बॉक्सिंग रिंगमध्ये उतरणारी साडेपाच फूट उंचीच्या निकोलाचा सामना तिच्यापेक्षा उंचीने कमी असणार्‍या मेरी कोमशी होणार आहे. त्यामुळे मेरी कोमला आपल्या रणनीतीत बदल करावा लागणार आहे.

मेरी कोमने आपल्या मागील दोन्ही सामन्यात स्ट्रेट पंच मारून अनेक पॉईंट मिळवले होते. दोघीही २९ वर्षांच्या आहेत.
पाच वेळा विश्वविजेतेपद पटकावण्यासाठी तुमच्यात काहीतरी वेगळी प्रतिभा असली पाहिजे. पण माझी उंची माझ्यासाठी बेरजेची बाजू ठरणार आहे, असे जागतिक विजेतेपदात तीन वेळा रौप्य पदक मिळवणार्‍या निकोलाने म्हटले आहे.

निकोलाने बल्गेरियाच्या स्तोयका पेट*ोव्हाला १६-७ ने पराभूत करून सेमीफायनलमध्ये स्थान मिळवले आहे.

ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सिंगचा पहिल्यांदाच समावेश करण्यात आला आहे. यामध्ये फक्त ५१, ६० आणि ७५ किलोग्रॅम वजनी गट पाडण्यात आले आहेत.
यापूर्वी मेरी कोमने ४८ किलोग्रॅम वजनी गटात जागतिक जेतेपद मिळवले होते. त्यामुळे तिला ऑलिम्पिकमध्ये ५१ किलोग्रॅम वजनी गटात यावे लागले आहे. तर निकोलाही ५४ किलोग्रॅम गटातून खाली येऊन ५१ किलो गटात उतरली आहे.