मुलीं जिन्स घालून आणि दुपट्ट्याविना दिसली तर अॅसिड हल्ला

रांची,८ ऑगस्ट-एका संस्थेने झारखंडची राजधानी रांची येथे जिन्स घालणार्‍या आणि दुपट्टा न वापरणार्‍या मुलींवर व महिलांवर अॅसिड हल्ला करण्याची धमकी देणारे पोस्टर्स लावले आहेत.

शहरात ठिकठिकाणी झारखंड मुक्ती संघ या संस्थेने हस्तलिखित पोस्टर्स लावले आहेत. सेंट झेव्हियर्स कॉलेज आणि अल्बर्ट एक्का राउंड अबाऊट येथे असे पोस्टर्स सापडले आहेत. २० ऑगस्टपासून मुलींनी जिन्स घालण्यावर बंदी घालण्यात आली आहे. एखादी मुलगी जिन्स घालून आणि दुपट्ट्याविना दिसली तर अॅसिड हल्ला केला जाईल, असे पोस्टर्समध्ये सांगितले आहे.

पोस्टर्समध्ये औद्योगीकरणासाठी स्थानिकांना स्थलांतरित करण्यावरही शाब्दिक हल्ला करण्यात आला आहे. बेकायदेशीरपणे जमिनीचे अधिग्रहण करणार्‍या कंपन्यांवर हल्ले केले जातील, असेही पोस्टर्समध्ये म्हटले आहे.

यासंदर्भात रांची येथील पोलिस अधिकारी म्हणाले, की आम्ही या संस्थेबाबत पहिल्यांदाच ऐकले आहे. पोस्टर्सच्या माध्यमातून कुणीतरी मस्करी केली असावी. संबंधित लोकांना पकडण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहेत.