गोपाळ ‘कांडा’चे वासनाकांड

हरियाणा हे एक श्रीमंत राज्य झाले आहेत. या राज्यात अनेक नवे उद्योग येत आहेत आणि गुडगाव, मानेसर, पानिपत या शहरांचा चेहरा मोहरा बदलून गेला आहे. उद्योगांना लागणार्या जमिनी एक कोटी रुपये प्रति एकर भावाने खरेदी केल्या जात आहेत आणि जमिनी जाणारे शेतकरी रात्रीतून कोट्यधीश होत आहेत. या पैशाचा माज समाजात दिसायला लागला आहे. पैशाने वाटेल ते मिळू शकते या कल्पनेत वावरणारे हे पैसाखोर लोक राजकारणात शिरून तिथेही नासाडी करायला लागले आहेत. गोपाल कांडा हे अशाच प्रवृत्तीचे नाव.

या गृहस्थाचा २००८ सालचा व्यवसाय होता चपला विकण्याचा पण तो राजकारणात शिरला. २००९ साली विधानसभेवर निवडून आला. ते निवडून आला आणि हरियाणात त्रिशंकू सरकार आले. त्रिशंकू सरकार म्हणजे संधीसाधू अपक्ष आमदारांचा सुवर्णकाळच. मग गोपाळ कांडाने ही संधी साधून तिथल्या  कॉंग्रेसच्या भूपिंदरसिंग हुडा सरकारला टेकू दिला. बदल्यात हट्टाने गृह खाते मागून घेतले. तिथून त्याचे काही मॉल, काही हॉटेल्स आणि चक्क विमान कंपनी उभी राहिली. असा सहजतेने पैसा मिळाला की माणसाचे मन चळायला कितीसा उशीर लागतो ?  गोपाळ कांडाला तशी संधी मिळाली. आपल्याच कंपनीतल्या सुंदर हवाई सुंदरीवर नजर पडली आणि एकतर्फी प्रेमाचा खेळ सुरू झाला. हवाई सुंदरीही हुरळली. गोपाळ कांडाने तिला आपल्या विमान कंपनीची संचालकही केले. तीही बघता बघता गडगंज श्रीमंत झाली. पण नंतर या दोघांचे बिनसले आणि अंतिमत: संचालक झालेल्या हवाई सुंदरीने आत्महत्या केली. मरताना गोपाळ कांडाच्या नावाने चिठ्ठी लिहून ठेवली. आता गोपाळ कांडा गजाआड झाला आहे. अशा प्रकारचा माणूस हरियाणाचा गृह राज्यमंत्री होता.

हे तर काहीच नाही. त्याचाच ओमप्रकाश जैन नावाचा एक मित्र आणि जिले सिंग शर्मा नावाचा सहकारी यांनी एवढा उच्छाद मांडला होता की, त्यांना कोणी अडवणाराच  उरलेला नाही असे वाटावे. तसे होतेही कारण गोपाळ कांडा हाच स्वत: गृहखात्याचा राज्यमंत्री होता. आता गोपाळ कांडा अडचणीत आला आहे. पण हे सारे उद्योग करताना त्याला मद चढला होता. आपले कोणीच काही करू शकत नाही अशा भ्रमात तो वावरत होता. पण शेवटी केलेल्या पापाची फळे चुकत नाहीत. हरियाणातला आणखी एक मंत्री चंदर मोहन ऊर्फ चांद मोहन याचाही प्रताप उघड झाला आहे.  हा चांद मोहन हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भजनलाल यांचा मुलगा. अन्य राज्यातल्याप्रमाणेच त्यांनीही आपल्या लाडक्या सुपुत्राला उपमुख्यमंत्री केले. खरे तर हे पद किती महत्त्वाचे आहे. या पदावरून गरिबांचे, राज्याचे कल्याण करण्याचा कोणी निश्चयच केला आणि तो मनापासून कामाला लागला तर त्याला जेवायला फुरसत मिळणार नाही इतके काम असते पण हा उपमुख्यमंत्री तशा काही तळमळीचा नव्हताच. त्याला इतरच उद्योग सुचायला लागले. राज्याची सरकारी वकील म्हणून काम करणार्या अनुराधा बाली या महिलेशी त्याची ओळख, मैत्री आणि प्रेम  अशा पायर्यांनी संबंध आले आणि या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण दोघेही हिंदू आहेत आणि विवाहित आहेत म्हणून त्यांना विवाह करता येईना मग मशिदीत जाऊन चंदरचा चांद झाला आणि अनुराधाची फिजा झाली. दोघांनी निकाह केला. राज्याचा उपमुख्यमंत्री  एक विवाहितेशी लग्न करता यावे म्हणून धर्म बदलतो ही घटनाच किती धक्कादायक आहे.

सेक्युलॅरिझम जिंदाबाद.  ती विवाहिता म्हणजेही दुसरी तिसरी कोणी नसून राज्याचे प्रमुख सरकारी वकील आहे. दोन्ही घराण्यांची बदनामी करून हे दोघे विवाहित झाले पण हा निकाह काही आठवडेही टिकला नाही. पुन्हा धर्माचा आधार घेऊन शोहर ने बिवी को तलाक दिया. 

 तेव्हापासून दोघांचे संबंध होते पण नाते संपले होते. त्यातून फिजाच्या आयुष्यात  प्रचंड तणाव निर्माण  झाला आणि तिने आत्महत्या केली. गोपाळ कांडा आणि  चांद मोहन यांची कहाणी त्यांच्या प्रेमपात्रांच्या आत्महत्यांनी संपली आहे. पण त्यामागची पार्श्वभूमी वेगवेगळी आहे. या चौघांच्याही आयुष्याची शोकांतिका केवळ अविचारामुळे झाली आहे.

गेल्या काही वर्षात आपल्या देशात राजकीय नेत्यांची अनेक प्रेमप्रकरणे गाजली आहेत. राजस्थानातले भंवरीदेवी प्रकरण असेच. तीही विवाहित होती आणि महिपाल  मदेरणा या मंत्र्याच्या नादाला लागली. शेवटी तिचा काटा काढण्यात आला. उत्तर प्रदेशात मधुमिता प्रकरण गाजले. ती अमरमणी त्रिपाठी या मंत्र्याच्या नादी लागली आणि या मंत्र्याला तिचा अडथळा वाटायला लागला की त्याने तिला संपवून टाकले. आपल्या संबंधातून निर्माण झालेल्या गर्भासह तिला विष पाजून संपवले. या सार्या प्रकरणात फसवल्या गेलेल्या महिला या काही साध्या भोळया गृहिणी होत्या आणि बिचार्या उगाच या लांडग्यांच्या तोंडी लागल्या असे काही घडलेल्या नाही. यातल्या प्रत्येक महिलेला राजकीय महत्त्वाकांक्षा होती आणि त्यापायीच त्या मंत्र्यांच्या नादी लागलेल्या होत्या. हा एक वेगळा प्रकार आहे.