आगामी लोकसभा तृणमूल स्वबळावर लढणार

नवी दिल्ली दि. ७ – देशात २०१४ साली होणार्‍या लोकसभा निवडणूकांत तृणमूल कॉंग्रेस स्वबळावर लढणार असल्याचे पक्षाकडून जाहीर करण्यात आले आहे. याचाच अर्थ तृणमूल यूपीएमधून बाहेर पडणार आहे. तृणमूलचे नेते सुदीप बंडोपाध्याय यांनी सोमवारी ही घोषणा केली. बंगालमधील लोकसभेच्या सर्व ४२ जागा तृणमूल जिंकेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

विशेष म्हणजे यूपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी त्यांच्या घरी घटक पक्षांसाठी दिलेल्या मेजवानीला उपस्थित राहिल्यानंतर त्यांच्या घराबाहेरच पत्रकारांशी बोलताना बंडोपाध्याय यांनी पक्षश्रेष्ठींचा हा निर्णय पत्रकारांना सांगितला. राष्ट्रपती निवडणुकीत कॉंग्रेस आणि ममता यांच्यातील संबंध ताणले गेले होते. कारण ममतांनी प्रवणदांना प्रथम विरोध केला होता. नंतर पाठिंबा देऊन राष्ट्रपती निवडणूक सुरळीत पार पडल्यानंतर तृणमूल व कॉंग्रेसमध्ये पुन्हा तणाव निर्माण होत असल्याचे संकेत मिळत होते. त्यातूनच ही घोषणा करण्यात आल्यामुळे आता पुन्हा एकदा कॉंग्रेस आणि तृणमूल बाजूला जात असल्याचे स्पष्ट झाले आहे असे जाणकारांचे मत आहे.