वॉशिंग्टन,७ ऑगस्ट-महागडी बायपास शस्त्रक्रिया आर्थिकदृष्टी परवडत नाही, अशा मधुमेह असलेल्या भारतीयांसाठी पर्यायी व्यवस्था म्हणून भारतात लवकरच ’ट्रिपल हार्ट थेरपी’ नावाची अतिशय कमी खर्चातील शस्त्रक्रिया येत आहे. अमेरिकास्थित भारतीय हृदय शल्यविशारद डॉ. मुकेश हरिआवाला यांनी हा पर्याय शोधला आहे.
डॉ. हरिआवाला म्हणाले की, हृदयविकार असलेल्या माझ्या मातृभूमीतील आणि उर्वरित जगभरातील गरीब रुग्णांसाठी अशाप्रकारची पर्यायी व्यवस्था आणताना मला विशेष आनंद होत आहे. या थेरपीमुळे आरोग्य विभागातील जागतिक अर्थव्यवस्थेवरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे.
बोस्टनमधील हार्वड येथून हरिआवाला यांनी अँजिओजेनेसिवरील संशोधन कार्यास सुरवात केली. त्यांनी शोधलेल्या ट्रिपल हार्ट थेरपीमुळे हृदयातील रक्तवाहिन्यांना उत्तेजन मिळून रक्तप्रवाह सुरळित होतो. या थेरपीमुळे जगामध्ये हृदयविकाराने जाणारे लाखो रुग्णांचे प्राण वाचण्यास मदत होईल, अशी त्यांना खात्री आहे. ही नैसर्गिक बायपास शस्त्रक्रिया असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
उत्कृष्ट ग्रामीण विकासासाठी लागणार्या आर्थिक संसाधनांचा चांगल्या प्रकारे उपयोग व्हावा आणि सर्व भारतीयांचे जीवनमान उंचावावे, हा माझा या शोधामागील हेतू आहे. मात्र, त्यासाठी सरकारने सक्रिय आणि आक्रमक धोरणे आखली पाहिजे, अशी अपेक्षा डॉ. हरिआवाला यांनी व्यक्त केली.
ही थेरपी समजावून सांगण्यासाठी ते मुंबईतील जसलोक रुग्णालयातील हृदयरोग विभागाला भेट देण्याच्या विचारात आहेत. तर, पुढील वर्षी आर्टीफिशल टिटॅनियम हार्ट अथवा व्हेटि*क्युलर असिस्ट डिव्हाईस बसविण्याची शस्त्रक्रिया भारतात आणतील.