काश्मिरी दहशतवाद्यांची वक्रदृष्टी आता पत्रकारांवर

श्रीनगर: काश्मिरी पंडिताना धमकाविल्यानंतर दहशतवाद्यांनी आपला मोर्चा पत्रकारांकडे वळविला आहे. पत्रकार भारतीय सुरक्षा दलाच्या सांगण्यावरून जिहादींच्या विरोधात लिखाण करीत आहेत. त्यांनी आपली चूक सुधारून काश्मीरच्या स्वातंत्र्य चळवळीला अनुकूल वार्तांकन करावे; अन्यथा वाईट परिणाम होतील; अशी धमकी पत्रकारांना देण्यात आली आहे.

दहशतवादी गटाचा कमांडर अबू इरफान याच्या नावाने काश्मीरमधील अनेक वृत्तपत्रांच्या कार्यालयात धमकी देणारी पत्र पाठविण्यात आली आहेत. पत्रकार काश्मीरच्या स्वतंत्र चळवळीला आणि जिहादला नकारात्मक प्रसिद्धी देत आहेत. त्यामुळे चळवळीला अडथळे येत असून जिहाद बदनाम होत आहे. त्यामुळे पत्रकारांनी यापुढे चळवळीला अनुकूल वार्तांकन करावे; असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

काश्मिरी पंडितांनी काश्मीर सोडून जावे; असा फतवा दहशतवादी संघटनांनी नुकताच जरी केला आहे. त्या पाठोपाठ आता पत्रकारांना धमक्या देण्यात येत आहेत. या प्रकारची कसून चौकशी केली जाईल; असे काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक एस. व्ही. सहाय यांनी सांगितले.