बेळगाव: कर्नाटकात सरकार कॉंग्रेसचे असो वा भारतीय जनता पक्षाचे; महाराष्ट्र कर्नाटक सीमावादात तेल ओतण्याची एकही संधी ते सोडत नाहीत. त्याचाच एक भाग म्हणून कर्नाटक सरकारने बेळगावातही सुसज्ज विधानभवन उभारले आहे. आगामी हिवाळी अधिवेशन याच भवनात घेणार असल्याची घोषणा कर्नाटकाचे मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी केली आहे.
कर्नाटकाचे आगामी हिवाळी अधिवेशन बेळगावात
मुख्यमंत्रीपदाची सूत्रे घेतल्यानंतर शेट्टर सोमवारी प्रथमच बेळगावात आले. त्यांनी बेळगावातील नव्याने उभारण्यात आलेल्या विधानभवनाची पाहणी केली आणि हिवाळी अधिवेशन याच भवनात घेण्याची घोषणाही केली.
कर्नाटक सरकारने ४६० कोटी रुपये खर्च करून नवीन विधानभवन उभारले असून ‘सुवर्ण विधानसौध’ असे या इमारतीचे नामकरण करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते सप्टेंबर महिन्यात करण्याचे नियोजन आहे. राष्ट्रपतींना या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी कर्नाटक सरकारचे प्रतिनिधी मंडळ लवकरच दिल्लीला रवाना होत आहे.
यापूर्वी देखील कर्नाटक सरकारने दोन वेळा एका खाजगी इमारतीत विधिमंडळ अधिवेशने घेतली आहेत.
