अत्याधुनिक एम-४ रायफल्स लष्कराला मिळणार

नवी दिल्ली दि.६ –  भारतीय लष्कराच्या स्पेशल फोर्स बटालियनला अमेरिकेच्या अत्याधुनिक एम – ४ रायफल्स मिळणार असून त्यासंबंधीचा करार नुकताच करण्यात आला आहे.हा करार कोट्यावधी रूपयांचा असून दहशतवाद्यांविरोधात कारवाई करताना या रायफल्स अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

विशेष असे की याच रायफल्स अमेरिकेच्या सील कमांडोजनी पाकिस्तानातील अबोटाबाद येथे अल कायदाचा प्रमुख ओसामा बिन लादेन याचा खात्मा करताना वापरल्या होत्या. तसेच इराक आणि अफगाणिस्तानातील कारवाईच्या वेळीही अमेरिकेच्या स्पेशल फोर्सने वापरल्या आहेत. अर्थात इस्त्रायल कडून घेण्यात आलेल्या अत्याधुनिक ट्रेव्हर २१ ला या रायफल्स हा पर्याय नाही तर लष्कराच्या बळकटीसाठी त्यांची खरेदी करण्यात येत आहे. गेली कांही वर्षे ट्रेव्हर २१ लष्कराच्या स्पेशल बटालियन फोर्सच्या वापरात असून त्यापूर्वी एके ४७ वापरल्या जात होत्या असेही समजते.

लष्कराच्या पॅराशूट रेजिमेंटमधील १० बटालियन पैकी आठ बटालियनना स्पेशल फोर्स प्रशिक्षण देण्यात आले असून त्यात शांतताकाळात दहशतवादी कारवायांविरोधात कारवाई करणे व युद्धकाळात सीमाभागातील शत्रूची ठाणी नष्ट करणे अशी कामे त्यांच्याकडे असतात. त्याचबरोबर ज्या भागात हे फोर्स तैनात असतात त्या भागात मुंबईतील २६/११ प्रमाणे घटना घडलीच तर त्याची हाताळणी करण्याचे महत्त्वाचे कामही हे फोर्स करतात. स्पेशल फोर्सची संख्या १० बटालियनवर नेण्याची लष्कराची योजना असून यात प्रत्येक बटालियनमध्ये ७०० जवान असणार आहेत असेही सांगण्यात येत आहे.