हिरोशिमा अणुबॉम्ब हल्ल्याचा वर्धापनदिन साजरा

दुसर्‍या जागतिक महायुद्धात जपानच्या हिरोशिमा शहरावर करण्यात आलेल्या अणुबॉम्ब हल्ल्याला आज ६७ वर्षे पूर्ण झाली. या घटनेची आठवण म्हणून आज म्हणजे सोमवारी सकाळी ८ वा.१५ मिनिटांनी जपानभर घंटानाद करण्यात आला तसेच दोन मिनिटे उभे राहून शांतता पाळण्यात आली. हिरोशिमावर झालेल्या हल्ल्यानंतर तेथे उभारण्यात आलेल्या हिरोशिमा पीस मेमोरियल पार्कमध्ये या अणुबॉम्ब हल्ल्यातून त्यावेळी बचावलेले नागरिक, त्यांचे नातेवाईक, सरकारी अधिकारी आणि कांही परदेशी नागरिकही उपस्थित होते.

अमेरिकेच्या बी -२९ या बॉम्बर विमानाने ६ ऑगस्ट १९४५ रोजी हिरोशिमावर अणुबॉम्ब टाकला आणि त्यात किमान १लाख ४० हजार लोकांचा बळी गेला. हिरोशिमा पूर्ण उध्वस्त झाले. त्यानंतर तीन दिवसांनी नाकासाकी या बंदरावरही असाच बॉम्ब टाकण्यात आला आणि हे शहरही उध्वस्त झाले. या बॉम्बचे दुष्परिणाम दीर्घकाळ भोगावे लागलेल्या जपानमध्ये गतवर्षी त्सुनामीमुळे उध्वस्त झालेल्या फुकुशिमा अणुभट्टी नुकसानीची भर पडली असून त्याचेही दुष्परिणाम जपान आज भोगत आहे. त्यामुळे यापुढे लष्करी अथवा नागरी कामासाठी अणुचा वापर कधीच केला जाऊ नये अशी प्रार्थना येथे जमलेल्या लोकांनी केली. डिसआर्मामेंट अफेअरच्या प्रतिनिधी अंजेला केन यांनी बान की मून यांनी पाठविलेला संदेश यावेळी वाचून दाखविला. त्यात जगात यापुढे अणुहल्ल्याला थारा नकोच पण मानवजातीच्या कल्याणासाठी जगातील सर्व अण्वस्त्रे नाहीशी केली जायला हवीत असे म्हणण्यात आले आहे.

विशेष म्हणजे या कार्यक्रमाला अमेरिकेचे माजी अध्यक्ष हॅरी ट्रूमन यांचे नातू क्लिंटॉफ ट्रूमन उपस्थित होते. अमेरिकेच्या याच अध्यक्षांनी हिरोशिमावर व नंतर तीन दिवसांनी नाकासाकीवर अणुबॉम्ब टाकण्याचे आदेश अमेरिकन विमानदलाला दिले होते. ट्रूमन यांच्या नातेवाईकांपैकी किलंटॉफ हे पहिलेच असे प्रतिनिधी आहेत जे जपानमध्ये या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले आहेत.