अमेरिकेतील विसकॉनसीन राज्यातील ओक क्रिक येथील गुरुद्वारात रविवारी अज्ञात व्यक्तींनी केलेल्या गोळीबारात ७ जण ठार झाले आहेत. यामध्ये गोळीबार करणाऱ्या एकाचा समावेश आहे.गोळीबार करणारी एक व्यक्ती मजबूत बांध्याची असून त्याच्या डोक्याला टक्कल पडले आहे. टी-शर्ट परिधान केलेल्या या थोराड व्यक्तीने गुरुव्दारात दोन हँडगनमधून अंदाधुंद गोळीबार केला.
अमेरिकेतील स्थानिक प्रमाण वेळेनुसार सकाळी साडे दहा वाजता हा गोळीबार झाला. यामध्ये पोलिस अधिकाऱ्यासह तीन जण जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून दोन हँडगन ताब्यात घेतल्या आहेत. गोळीबार करणाऱ्या तिघांपैकी एकाची ओळख पटली असून, त्याच्या दंडावर 9/11 चा टॅटू असल्याचे सांगण्यात येत आहे. या गोळीबाराचा तपास अमेरिकेची गुप्तहेर संघटना एफबीआयकडे देण्यात आला आहे. हा हल्ला स्थानिक दहशतवाद्यांचे कृत्य असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
गोळीबारानंतर गुरुद्धारातील सर्व नागरिकांना बाहेर काढण्यात आले असून, परिसरात नाकेबंदी करण्यात आली आहे. या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांबाबत भारतीय दुतावासाने दुःख व्यक्त केले असून, भारताचे परराष्ट्रमंत्री एस. एम. कृष्णा अमेरिकेतील भारतीय दुतावासाच्या संपर्कात आहेत.
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांना या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. व्हाईट हाऊसने प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, मिशेल आणि मी दोघेही विसकॉनसीनमधील नागरिकांविषयी दुःख व्यक्त करतो. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांचा कुटुंबियांना आणि जखमी झालेल्या नागरिकांना सर्व मदत करण्यात येईल. या हल्ल्याच तपास लगेच करण्यात येईल.
गेल्या दोन आठवड्यांत अमेरिकेत घडलेली ही गोळीबाराची दुसरी घटना आहे. कोलरॅडो येथे एका चित्रपटगृहात झालेल्या गोळीबारात १२ जणांचा मृत्यू झाला होता. रविवारी झालेल्या या हल्ल्याच्या निषेधार्थ अकाली दलाने नवी दिल्लीतील अमेरिकेच्या दुतावासाबाहेर आंदोलन करण्याची योजना आखली आहे. गुरुद्वारा हल्ला झाला तेव्हा, गुरुव्दारामध्ये सुमारे ४०० नागरिक असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.