नवी दिल्ली: सन २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस किंवा भारतीय जनता पक्षाचा उमेदवार पंतप्रधानपदी असणार नाही; असे मत ब्लॉगवर व्यक्त करून भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांनी आपल्याच पक्षाचा मुखभंग केला आहे. मात्र या निवडणुकीत तिसरी आघाडीही सरकार स्थापन करण्याच्या स्थितीत नसेल; असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची मोठी पीछेहाट होईल. त्या पक्षाला १०० जागांवर आपले उमेदवार निवडून आणणेही कठीण होईल; असा अंदाज वर्तवितानाच भाजपाही आपल्या उमेदवाराला पंतप्रधानपदी बसविण्याच्या स्थितीत असणार नाही; असेही त्यांनी नमूद केले आहे. या दोन्ही मोठ्या पक्षांना एक पाऊल मागे येऊन दुसऱ्या; तुलनेने लहान पक्षाच्या उमेदवाराला पाठींबा देऊन पंतप्रधान पदावर त्याची स्थापना करणे भाग पडेल; असा अडवानी यांचा कयास आहे.
मात्र एकीकडे या दोन्ही राष्ट्रीय पक्षांकडे पुरेसे बहुमत नसेल; अशी शक्यता वर्तवितानाच अडवानी तिसरी आघाडी या निवडणुकीतही फारसा प्रभाव दाखवू शकणार नाही; असेही म्हणतात. आगामी सार्वत्रिक निवडणुकीनंतर सरकार स्थापन करताना राष्ट्रीय पक्षांना प्रादेशिक पक्षांच्या नाकदुर्या काढाव्या लागतील. इतकेच नव्हे तर पंतप्रधानपदाची खुर्चीही त्यांना बहाल करावी लागेल; असा अडवानी यांचा होरा असल्याचा अर्थ त्यांच्या कथनावरून काढला जात आहे.
दरम्यान या ब्लॉगबद्दल काँग्रेसच्या वतीने कडवट प्रतिक्रिया देण्यात आली. अडवानी यांनी केवळ भाजपची काळजी वाहावी. कॉंग्रेसच्या भवितव्याबाबत त्यांनी विचार करण्याची गरज नाही; असे काँग्रेसने सुनावले आहे.