
केरळच्या थिरुवनंतपुरम किंवा त्रिवेंद्रम या राजधानीच्या ठिकाणी असलेले पद्मनाभस्वामी मंदिर अलिकडेच तेथे सापडलेल्या १ लाख कोटी रूपयांपेक्षा जास्त किंमतीच्या खजिन्याने जगभरात प्रसिद्धीस आले आहे.

अनंतशयनम पोझमधील योगनिद्रा घेणारी महाविष्णूची या मंदिरातील मूर्ती म्हणजे आश्चर्याचा अप्रतिम नमुना म्हणावी लागेल. राजधानीचे थिरूवनंतपुरम हे नांव ही याच देवावरून ठेवले गेले आहे. पाच फड्याच्या अनंत नागावर विसावलेला महाविष्णू एकाचवेळी नजरेत मावत नाही. कारण मस्तक, नाभी आणि पावले यांचे तीन वेगवेगळ्या दारांतून दर्शन घ्यावे लागते.

यामागे कथा अशी सांगितली जाते की, चंद्र आणि इंद्र यांनी पद्म क्षेत्री विष्णूची १०८ दिवस प्रार्थना केली आणि विष्णू प्रकटला तो हा पद्मनाभ. देशातील सात परशुराम क्षेत्रांपैकी हे एक स्थान. लँड ऑफ अनंत पद्मनाभस्वामीची ही मूर्ती नेपाळहून आणलेल्या खास गंडगी नदीतील शिळांपासून बनविलेल्या १२००८ शाळिग्रामातून घडविली गेली आहे. या मूर्तीवरही आयुर्वेदिक मिश्रणाचा लेप देण्यात आला असून या देवाने त्रावणकोरच्या राजाला शत्रूशी लढताना प्रत्यक्ष येऊन मदत पुरविली अशीही कथा सांगितली जाते.

पद्मपुराण, विष्णुपुराण, वराहपुराण आणि वायुपुराणात या क्षेत्राचा उल्लेख आहे.त्रावणकोरचे आठ बलशाली राजे त्यातील एक मार्तंड वर्मा याने या मंदिराचा ताबा घेतला आणि या मंदिरासाठी खूप मोठमोठी कामे केली. याच राजाने त्रावणकोरचे राज्य ३ जानेवारी १७५० साली पद्मनाभस्वामींकडे सोपविले म्हणजे राज्य मंदिराच्या नावे करून दिले आणि आपण त्याचे दास या भावनेने राज्यकारभार केला. पद्मनाभ राज्याचा मालक बनला त्यावरून केरळला गॉडस ओन कंट्री असे म्हटले जाते. मार्तंडानंतर आलेल्या त्याच्या वारसांनीही देवाचे दास हीच भावना कायम ठेवून राज्यकारभार केला. सध्याचा उत्तरदम थिरूनल मार्तंडस्वामी राजाही स्वत:ला या मंदिराचा दास म्हणवून घेतो.

देवाची पूजेची मूर्ती मूळ मूर्तीबरहुकुम पूर्ण सोन्यात घडविलेली आहे. याच मंदिराच्या तळघरात असलेल्या कोठारातून प्रचंड मोठा खजिना नुकतचा बाहेर काढण्यात आला आहे. त्यात सोन्याच्या मूर्ती, बेल्जियम हिरे, माणके, पाचू, सोन्याचे दोर, दंड, इंद्रनील, सोन्याची नाणी, सोन्याचे हत्ती, सोन्याचे रत्नजडीत मुकुट, नारळ अशा असंख्य दुर्मिळ वस्तू आहेत. द्रविडी पद्धतीने मंदिराचे बांधकाम करण्यात आले असून तंजोरचे विश्वकर्मा स्थपती यांनी ही वास्तुरचना केल्याचे उल्लेख सापडतात.

मंदिरातील कागदपत्रांत अशीही कथा आढळते, की दिवाकर मुनींनी केलेल्या तपश्चर्येचे फळ म्हणून कासगोड येथे लहान मुलाच्या रूपात विष्णूने त्यांना दर्शन दिले. या मुलाने शाळिग्राम पाडल्याने रागावलेले मुनी त्याच्या मागे धावले तेव्हा तो झाडात लुप्त झाला आणि याच झाडाने अनंत नागाचे रूप घेतले. नागावर विसावलेली विष्णू मूर्ती इतकी प्रचंड होती की मुनींना ती पाहताच येईना म्हणून त्यांनी लहान रूपात येण्याचे आवाहन विष्णूंना केले व सध्याच्या मूर्तीरूपात विष्णू अवतरले. अनंत नागावर योगनिद्रा घेणार्या विष्णूंचा उजवा हात शिवलिंगावर आहे. डोक्याखालचे नागाचे प्रचंड वेटोळे आणि विष्णूमुख इतकेच दर्शन पहिल्या दरवाजातून होते. मधल्या दरवाज्यातून नाभीतून वर आलेल्या कमलातील ब्रह्मदेव दिसतात तर तिसर्या दरवाजातून पदकमलांच्या दोन्ही बाजूस बसलेल्या श्रीदेवी आणि भूदेवी म्हणजे पृथ्वीमातेचे दर्शन होते. दाक्षिणात्य पद्धतीप्रमाणे येथेही गाभार्यात विजेचे दिवे नाहीत आणि समयांच्या प्रकाशातच मूर्ती पहावी लागते. दर्शनासाठी गर्दीही खूप असते.
या मंदिराचे गोपूर १५६६ साली बांधण्यात आले असून ते १०० फूट उंच आणि सात मजली आहे. मंदिराजवळच पद्मतीर्थ सरोवर आहे. मंदिराच्या प्रकारात ३६५ हून अधिक कोरीव दगडी खांब असून प्रकारात ८० फूट उंचीचा भव्य स्तंभ आहे. गोपुराच्या खालच्या मजल्यातूनच मंदिरात प्रवेश करता येतो. येथे वर्षातून दोन वेळा होणार्या उत्सवात कथकली आणि अन्य पारंपारिक नृत्यांचे कार्यक्रम केले जातात. मंदिराजवळच असलेला त्रावणकोर राजाचा संपूर्ण लाकडात बांधलेला राजवाडा अतिभव्य असून राजवाड्याची भेटही चुकवू नये अशीच आहे. त्रिवेंद्रम रेल्वे, विमान सेवेने देशभराशी जोडलेले असल्याने प्रवास सहज होतोच. जाण्यासाठी उत्तम काळ जानेवारी फेब्रुवारी ते एप्रिलपर्यंतचा.
