कार उत्पादकांची चलाखी

कोणत्याही मालाचा उत्पादक आपल्या मालाची विक्री कशी करायची किवा वाढवायची याच्या साठी नाना कल्पना शोधून काढत असतो. मग भले तो सेप्टी पिन बनविणारा उत्पादक असो वा आलिशान, महागड्या गाड्या बनविणारा उत्पादक असो. बीएमडब्ल्यू, मर्सिडीज, ऑडी यासारख्या गाड्या बनविणारे उत्पादकही त्याला अपवाद नाहीत याचीच प्रचीती आता येऊ लागली आहे.

ग्राहकाचे वीक पॉईंटस शोधून त्यालाच टारगेट करणे हे विक्री वाढविण्याचे मुख्य सूत्र असते. भारतात आज तरूणांची संख्या मोठी आहे. आणि बहुतेक भारतीयांचे क्रिकेट आणि बॉलिवूडमधील कलाकार हे जीवनाचे अविभाज्य भाग आहेत हे या कंपन्यांनी बरोब्बर हेरले असून आपल्या उत्पादनांची जाहिरात करण्यासाठी क्रिकेटपटू आणि बॉलिवूड कलाकरांची निवड केली आहे व आपली नाळ भारतीय तरूणाईशी जोडली आहे. दिल्लीतील बुद्ध इंटरनॅशनल येथे देशातील पहिल्यावहिल्या स्पोर्टी टूरर या नव्या बी क्लास कारच्या उद्घाटनासाठी मर्सिडीजने बॉलिवूड तारका जेनेलिया डिसूझा, रितेश देशमुख, कल्की कोचलीन आणि गौरव कपूर यांना सहभागी करून घेतले होते. या गाडीच्या ग्राहकांसाठी कंपनीने अल्टीमेट टूरिंग ट्रेल ही मोहिमही राबविली असून त्या जेनेलियाच्या सहवासात ही टूर ग्राहक करू शकणार आहेत.

बीएमडब्ल्यूने यापूर्वीच आपल्या नव्या उत्पादनासाठी क्रिकेटचा बादशहा सचिन तेंडुलकरची ब्रँड अँबॅसिडर म्हणून नेमणूक केली आहे तर  देशातील पहिली ऑडी ए-८ एल कंपनीने हिरो अभिषेक बच्चनला नुकतीच दिली आहे. असे सांगितले जाते की अभिषेकनेच ही अत्याधुनिक गाडी आपल्या लेकीच्या जन्मानिमित्त बुक केली होती. ऑडीने यापूर्वींही सलमानखानला क्यू ७ तर क्रिकेटपटू युवराज सिंग याला क्यू ५ ही मॉडेल्स भेट दिली आहेत. युवराजला मॅन ऑफ द सिरीज बनल्याबद्दल ही गाडी देण्यात आली होती.

कार उत्पादक कंपन्यांनी त्यांच्या मालाच्या विक्रीसाठी लढविलेल्या या आयडिया चांगल्याच यशस्वी होताना दिसत असून मंदीच्या काळातही या महागड्या गाड्यांची भारतात वाढत चाललेली विक्री हे या जाहिरातींचे यशच म्हणायला हवे.

Leave a Comment