नवी दिल्ली: एकाच वेळी तीन पॉवर ग्रीडमध्ये बिघाड होऊन निम्म्या देशातील विद्युत पुरवठा खंडीत होण्यामागे आंतरराष्ट्रीय कट असून सायबर हल्ल्याद्वारे ग्रीडमध्ये बिघाड निर्माण करण्यात आल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

देशाच्या बहुसंख्य भागाला वीज पुरवठा करणारे उत्तर, पूर्व आणि ईशान्य ग्रीड दि.३०, ३१ जुलै रोजी बिघडले आणि देशातील १९ राज्य आणि २ केंद्रशासित प्रदेशांचा वीज पुरवठा खंडीत झाला. ग्रीडची दुरुस्ती होऊन वीज पुरवठा सुरळीत झाल्यावर या बिघाडाची कारणमीमांसा केली जात आहे. त्यामध्ये सीमेपलीकडून सायबर हल्ल्याची शक्यताही विचारात घेतली जात आहे.
देशाच्या विविध भागांना वीज पुरवठा करण्यासाठी एकूण पाच ग्रीड बसविण्यात आले आहेत. या ग्रीडचे संचालन एका सॉफ्टवेअरमार्फत केले जाते. सायबर हल्ल्याद्वारे या सॉफ्टवेअरमध्ये बिघाड उत्पन्न करून ग्रीडची यंत्रणा निकामी केल्याच्या शक्यतेवर गुप्तचर संस्था अभ्यास करीत आहेत. अशा प्रकारचा सायबर हल्ला रोखण्यासाठी आणि असा हल्ला झाल्यास त्याचा स्त्रोत शोधण्यासाठी देशात पॉवर ट्रान्समिशन नेटवर्क उभारणे अत्यावश्यक असल्याचे मत या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.