टीम अण्णा उपोषण गुंडाळणार

नवी दिल्ली: टीम अण्णाने सशक्त लोकपाल विधेयकासाठी केलेले उपोषण निष्प्रभ ठरून अखेर शुक्रवारी गुंडाळण्यात येणार असल्याची माहिती खुद्द ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी जंतरमंतर मैदानावर दिली. अनेक मान्यवरांनी ही रस्त्यावरची लढाई संसदेत गेल्याखेरीज सुटणार नाही असा सल्ला दिल्याने हा लढा मागे घेण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र टीम अण्णा अथवा स्वत: अण्णा राजकीय पक्ष स्थापन करणार नाहीत किंवा निवडणूक लढविणार नाहीत; असेही त्यांनी स्पष्ट केले.

मात्र टीम अण्णा स्वत:चा पक्ष स्थापन करणार नसली तरीही लोकपाल विधेयकासारखा मुद्दा संसदेतच मार्गी लागू शकत असल्याने देशप्रेमी, प्रामाणिक आणि पारदर्शी उमेदवाराला पाठींबा देण्याचा आणि त्याचा प्रचार करण्याचा निर्णय टीम अण्णाने घेतला आहे. मी स्वत: राजकीय यंत्रणेत सहभागी होऊ इच्छित नाही. मात्र भ्रष्टाचारी यंत्रणेला राजकीय आव्हान देण्यात काही गैर नाही. त्यामुळे भ्रष्ट व्यक्ती संसदेत जाणार नाही; याकडे टीम अण्णाचा कटाक्ष असेल; असे अण्णांनी स्पष्ट केले.

सध्याच्या राजकीय पक्षांना पर्याय उभा करण्यासाठी कार्यकर्त्यांनी देशातील ६ लाख ५० हजार ग्रामसभांच्या मताचा कानोसा घ्यावा. त्यापैकी किमान १ लाख ग्रामसभांनी राजकीय पर्याय देण्याच्या बाजूने कौल दिल्यास आपण त्याचा विचार करू; असेही अण्णांनी सांगितले.