नवी दिल्ली: न्याय्य मागण्यांसाठी उपोषण म्हणजे आत्महत्या नव्हे. आत्महत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून आम्हाला जबरदस्तीने रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न सरकारने करू नये. अन्यथा हे सरकार इंग्रजी सत्तेहूनही वाईट ठरेल; असा इशारा टीम अण्णाचे ज्येष्ठ सदस्य अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी दिला.
टीम अण्णाचे ज्येष्ठ सदस्य अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया आणि गोपाल राय हे लोकपालाच्या मागणीसाठी जंतर मंतर येथे आठ दिवसापासून उपोषण करीत आहेत तर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे चार दिवसापासून उपोषणात सहभागी आहेत. सरकारने मात्र या आंदोलनाची काहीच दाखल घेतलेली नाही. उपोषणामुळे अण्णा यांच्यासह केजरीवाल आणि राय यांची प्रकृती ढासळली आहे. वैद्यक तज्ज्ञांनी त्यांना उपोषण थांबवून रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला. मात्र आपण बलिदानास तयार आहोत; असा निर्धार व्यक्त करून टीम अण्णाने उपोषण सुरूच ठेवले आहे.
आम्ही मरणाला घाबरत नाही. सरकारच आमच्या आंदोलनाला घाबरले आहे; अशी टीका करून अण्णा म्हणाले की या देशात उपोषणाची परंपरा आहे. उपोषण करणे हा गुन्हा नाही. सरकारने आमच्यावर जबरदस्ती केली तरी आमचे उपोषण सुरूच राहील.