ऍग्री बिझनेस मॅनेजमेंट

edu2

कृषी व्यवसायाचे महत्व कमी समजले जाते. परंतु शेवटी प्रत्येक माणसाला खायला लागतेच.जोपर्यंत माणूस खाल्ल्याशिवाय जगत नाही तोपर्यंत शेती व्यवसायाला काही धोका नाही. विशेषत: लोकांच्या खाण्याच्या सवयी बदलत चालल्या आहेत, त्यामुळे शेती व्यवसायातील उत्पादनांचे पॅकिंग, पार्सलिंग, सॉर्टिंग आणि प्रोसेसिंग यांचे महत्व वाढत चालले आहे आणि घरात शेती नसणारा तरुणसुद्धा कृषी क्षेत्रामध्ये वरील सर्व कामांचे व्यवसाय सुरू करू शकत आहे. शेतीमध्ये ज्याला काढणी पश्‍चात सेवा असे म्हटले जाते त्या सेवेचे महत्व फार वाढत आहे. आपल्या देशातला शेतकरी बाजाराचा विचार करून शेतीचे नियोजन करत नाही. त्यामुळे तो फसतो. म्हणून आता शेती व्यवसायामध्ये बाजाराचा विचार महत्वाचा ठरायला लागला आहे आणि हा बाजाराचा विचार शेतकर्‍यांना समजावून सांगणे हा सुद्धा ऍग्री बिझनेसचा एक भाग झाला आहे.

शेतकरी आपला माल ओबडधोबड कसाही विकून टाकतो. आपल्या गावामध्ये आपल्या मालाला काही किंमत येत नाही, अशी त्याची नेहमीची ओरड असते. परंतु हाच माल परदेशात किंवा मोठ्या शहरांमध्ये चांगल्या किंमतीला विकला जात असतो. तेव्हा तो कोणत्या शहरात न्यावा, कधी न्यावा, कसा न्यावा आणि कोठे विकावा याचा सल्ला देण्यासाठी ऍग्री बिझनेस करणारे सल्लागार उपयोगी पडत असतात. थोडक्यात सांगायचे तर शेतकर्‍यांना पिकवता येते पण विकता येत नाही, त्यामुळे तो गरीब राहतो. त्याला श्रीमंत करायचे असेल तर पिकवावे कसे आणि विकावे कसे या दोन्ही गोष्टी त्याला कळल्या पाहिजेत. ते कळवण्याचे काम ऍग्री बिझनेसमन करत असतो. गुजरातेतील अहमदाबादच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट या नामवंत संस्थेमध्ये ऍग्री बिझनेस मॅनेजमेंटचा दोन वर्षाचा पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकवला जातो.

हा अभ्यासक्रम व्यवस्थापनाच्या विद्यार्थ्याला शेती शिकविणारा अभ्यासक्रम आहे. दुसर्‍या बाजूने काही कृषी विद्यापीठांनी शेतकर्‍यांना व्यवसाय व्यवस्थापन शिकविणारे अभ्यासक्रम सुरू केलेले आहेत. एकंदरीत शेती व्यवसाय आणि व्यवस्थापन या दोन्हींचा मिलाप करून ही नवी विद्याशाखा विकसित केली जात आहे. अहमदाबादच्या संस्थेचा ई-मेल ऍड्रेस www.iimahd.ernet.in असा आहे. अशाच प्रकारचा आणखी एक अभ्यासक्रम गुजरातच्याच आणंद येथे सुरू करण्यात आलेला आहे. या संस्थेचे नाव इन्स्टिट्यूट ऑफ रूरल मॅनेजमेंट (आयआरएमए) असे असून तिथे कृषी व्यवस्थापनाचा पदव्युत्तर दोन वर्षाचा अभ्यासक्रम आहे. या दोन्ही संस्थांतील अभ्यासक्रमाचा पूर्ततेनंतर विद्यार्थ्यांना उत्तम नोकरी मिळू शकते. आजवर या संस्थांतील विद्यार्थ्यांनी चांगल्या नोकर्‍याही मिळविल्या आहेत. काहींनी कन्सल्टन्सी सुरू केलेली आहे.

Leave a Comment