उत्तर आणि पूर्व भागाच्या ग्रीडमध्ये मंगळवारी २४ तासात दुसऱ्यांदा मोठा बिघाड झाल्याने राजधानी दिल्लीसह १४ राज्यातील वीज पुरवठा खंडीत झाला आहे. या प्रकारची चौकशी करण्याची घोषणा केंद्रीय उर्जा मंत्री सुशील कुमार शिंदे यांनी केली आहे.
पुन्हा निम्मा देश अंधारात
उत्तर भारताला विद्युत पुरवठा करणारया ग्रीडमध्ये बिघाड झाल्याने सोमवारी दिल्लीसह उत्तरप्रदेश, हरयाणा, पंजाब अशा उत्तरेकडील सर्व राज्यांचा विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. त्यामुळे या भागातील जनजीवन विस्कळीत झाले. ही परिस्थिती पूर्णपणे मूळ पदावर येण्यापूर्वीच पुन्हा मंगळवारी ग्रीडमध्ये बिघाड झाला. वीज पुरवठा खंडीत झालेल्या राज्यात पूर्वेकडील राज्यांचीही भर पडली आणि निम्मा देश अंधारात बुडाला.
पाणी शुद्धीकरण आणि पुरवठा, आरोग्य व उपचार सेवा, रेल्वे, मेट्रो अशा सर्व सुविधा विजेअभावी कोलमडल्या. सलग दुसऱ्या दिवशी निर्माण झालेल्या या वीज संकटाच्या कारणांची चौकशी केली जाणार आहे.
