नवी दिल्ली: कॉंग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांच्यावर अपहरण आणि बलात्काराचे खोटे आरोप करून जनहित याचिका दाखल करण्यास समाजवादी पक्षाच्या श्रेष्ठींनी भरीस घातले; अशी खळबळजनक कबुली माजी आमदार किशोर समरिते यांनी सर्वोच्च न्यायालयात दिली.
सपा श्रेष्ठींच्या आदेशाने राहुल गांधींविरुद्ध खोटी याचिका
समरिते यांनी सन २०१० मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयात अपहरण आणि बलात्काराचे आरोप करून गांधी यांच्या विरुद्ध कारवाईची मागणी करणारी याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावतानाच खोटी याचिका दाखल केल्याबद्दल समरिते यांना ५० लाखाचा दंड ठोठावला. त्याचप्रमाणे त्यांची केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले.
उच्च न्यायालयाच्या या निकालाला समरिते यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. सर्वोच्च न्यायालयाने हे अपील दाखल करून उच्च न्यायालयाच्या निकालाला स्थगिती दिली. न्यायालयाच्या आदेशानुसार राहुल गांधी यांनी आपले शपथपत्रही सादर केले. मात्र या अपिलाच्या सुनावणीत समरीतेने ही खळबळजनक कबुली देऊन खटल्याला नवे वळण दिले आहे.
