‘तृणमूल’ने केले रेल्वेचे वाटोळे: खासदार चौधरी

कोलकाता: देशाच्या रेल्वे मंत्र्यांना आपल्या जबाबदारीकडे लक्ष द्यायला वेळ नाही. त्यांचा बहुतेक वेळ त्यांच्या नेत्यांची सेवा करण्यात जातो; अशी बोचरी टीका काँग्रेस खासदार अधीर चौधरी यांनी केली. तृणमूल काँग्रेस पक्षाने भारतीय रेल्वेचे वाटोळे केले आहे; असा आरोपही त्यांनी केला.

दिल्ली चेन्नई तामिळनाडू एक्स्प्रेसला सोमवारी नेल्लोरेजवळ आग लागून त्यात किमान ३५ जणांचा मृत्यू झाला तर २५ जण जखमी झाले. या पार्श्वभूमीवर चौधरी यांनी रेल्वेमंत्री आणि तृणमूल काँग्रेसवर तोंडसुख घेतले.

रेल्वेमंत्री मुकुल रॉय यांचा बहुतेक वेळ त्यांच्या नेत्या आणि प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बेनर्जी यांच्या सेवेत जातो. त्यामुळे त्यांना रेल्वेमंत्री म्हणून काम करण्यास वेळच उरत नाही; अशी टीका करून चौधरी पुढे म्हणाले की; रेल्वे मंत्र्यांना रेल्वेपेक्षा आपल्या पक्षाची काळजी अधिक आहे.एकेकाळी नफ्यात असणारी रेल्वे सन २००९ पासून तृणमूल काँग्रेसकडे आल्यापासून गाळात जात आहे; अशी टीकाही त्यांनी केली.

केंद्रात तृणमूल काँग्रेसने संयुक्त विकास आघाडीशी संधान बांधल्यानंतर रेल्वे खाते ममता बेनर्जी यांनी आपल्याकडे घेतले. प. बंगालमध्ये कम्युनिस्टांचे पानिपत घडविण्यात यशस्वी ठरल्यावर त्या राज्यात लुख्यामंत्री म्हणून गेला आणि रेल्वेमंत्री पदावर दिनेश त्रिवेदी यांची वर्णी लावली. मात्र रेल्वेची भाडेवाढ न करण्याच्या ममतादीदी यांच्या आदेशाचे त्रिवेदी यांनी उल्लंघन केल्याने त्यांची अल्पावधीतच रेल्वेमंत्री पदावरून उचलबांगडी झाली. त्या जागी ममतादीदींचे खास विश्वासू म्हणून रॉय यांची निवड झाली.