शेवटचा अंतराळवीर चंद्रावर उतरला त्या घटनेला आता चाळीस वर्षांचा कालावधी लोटला आहे. अमेरिकेने १९६९ ते १९७२ या काळात सहा चांद्रमोहिमा राबविल्या आणि प्रत्येक मोहिमेत चंद्रावर उतरलेल्या अंतराळवीरांनी अमेरिकेचे झेंडे चांद्र जमिनीवर रोवले. आता चाळीस वर्षांनंतर या झेंड्यांचे नक्की काय झाले असेल याचे कुतुहुल सर्वसामान्य माणसांप्रमाणेच नासाच्या संशोधकांनाही होते. त्यातूनच नासाने नासा ल्यूनर रिकन्सायन्स ऑरबिटर कॅमेर्याने रात्रीच्या वेळी चंद्राच्या पृष्ठभागाचे फोटो घेतले तेव्हा हे झेंडे चंद्रावर आजही फडकत असल्याचा पुरावाच या कॅमेर्याने त्या झेंड्यांच्या चंद्राच्या जमिनीवर पडलेल्या सावल्यांतून सादर केला असल्याचे समजते.
हे झेंडे जेथे रोवले गेले त्या अनुषंगाने या प्रतिमांचे विश्लेषण करण्यात आले तेव्हा सहा पैकी पाच झेंडे अजूनही ताठ उभेच असल्याचे दिसून आले नासाकडून सांगण्यात आले आहे. सहा मोहिमांत प्रत्येक वेळी चंद्रावर उतरलेल्या अंतराळवीरांनी एक एक अमेरिकन फ्लॅग तेथे रोवला. आपल्या देशाने विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रात जे यश मिळविले त्याचे प्रतीक म्हणून हे झेंडे रोवले गेले होते. २० जुलै १९६९ ला अपोलो ११ यान चंद्रावर उतरले आणि चंद्राच्या भूमीवर पहिले पाऊल ठेवले ते नील आर्मस्टाँग या अंतराळवीराने तेव्हा लाईव्ह मेसेज देताना तो म्हणाला होता की, वन स्मॉल स्टेप फॉर मॅन, वन जायंट लीप फॉर मॅनकाईंड . अपोलो १७ हे शेवटचे यान डिसेंबर १४, १९७२ साली चंद्रावर उतरले होते.
अपोलो ११ मधील अंतराळवीर मार्क रॉबिनसन याने चंद्रावरून परतताना यानातून बाहेर टाकलेल्या प्रचंड हवेच्या झोतामुळे रोवलेला झेंडा खाली पडल्याचे तेव्हाच सांगितले होते. ते तंतोतंत खरे ठरले असून सहा पैकी पाचच झेंडे उभे दिसत आहेत असेही नासाच्या ल्यूनर सॅटेलाईट प्रोग्रॅमचा इन्व्हेस्टीगेटरचे म्हणणे आहे. चंद्रावर तापमान २५० ते २८० फॅरेनहिट असते आणि तेथे अल्टाव्हायोलेट किरणांचा प्रभावही अधिक असतो तरीही हे झेंडे कसे अजूनही उभेच आहेत याविषयी त्याने आश्चर्य व्यक्त केले आहे. मात्र हे झेंडे मुळच्याच रंगात आहेत का विटले आहेत याविषयी मात्र नक्की सांगता येत नसल्याचेही त्याचे म्हणणे आहे.