मुंबई, दि.३१ – इंडीया बुल्स, व्हिडीओकॉन, महिंद्रा अँण्ड महिंद्रा कंपनीचे सेझ प्रकल्प रद्द करण्यात आले आहेत. महाराष्ट्र राज्य ओद्योगिक विकास महामंडळाच्या म्हणजेच एमआयडीसीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. रायगड, पुणे, औरंगाबाद येथील हे प्रस्तावित प्रकल्प रद्द करण्यात आले. या प्रकल्पांना शेतकर्यांनी विरोध केल्याने हा निर्णय घेण्यात आला.
भूसंपादनाला मोठ्या प्रमाणावर विरोध झाल्याने सेझ प्रकल्पांच्या प्रवर्तकांची या प्रकल्पातील रुचीही संपुष्टात आल्याने हे प्रकल्प रद्द करण्यात आले आहेत.
रायगडमधील रिलायन्स कंपनीच्या खोपटा सेझलाही शेतकरी कडाडून विरोध करीत होते. या प्रकल्पाला घालविल्याशिवाय शेतकरी गप्प बसणार नाहीत, असा इशारा प्रा. एन. डी. पाटील यांनी दिला होता. ‘सेझ’साठी शक्यतो लागवडीखालील सुपीक जमीन घेऊ नये, अन्यथा होणारी हानी फार मोठी असेल, असे तोंडी मत उच्च न्यायालयाने व्यक्त केले होते. पुणे जिल्ह्यातील खेड-राजगुरुनगर जवळच्या एमआयडीसी-भारत फोर्ज यांच्या ’सेझ’साठी हजारो हेक्टर सुपीक जमीन संपादित करण्याच्या सरकारच्या कृतीला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. गुळणी-वरुडे गावच्या दिलीप ढेरंगे, भगवान गुळणकर आदी सुमारे सोळा ग्रामस्थांनी ऍड. सुनील दिघे यांच्यामार्फत ही याचिका सादर केली होती.